राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो, अजितदादा माझ्या प्रचाराला पुरंदरला येणार – विजय शिवतारे
सातारा : अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे.
राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. परंतु, कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे अजितदादा पुरंदरला माझ्या प्रचारासाठी येतील, असंही शिवतारे यांनी सांगितलं.
अजित पवार कुटुंबावर २०१९ च्या निवडणुकीत केलेल्या वादग्रस्त टीकेवरुन विधानसभेला विजय शिवातारेंचा पराभव करण्याचा चंग अजित पवारांनी बांधला होता. यासंदर्भातील थेट आव्हानच अजित पवारांनी एका सभेमध्ये दिलं होतं. अजित पवारांवर टीका करणं ही आपली चूक होती, अशी जाहीर कबुली शिवतारेंनी दिली होती. एखाद्या राजकीय नेत्याचा मुलगा जेव्हा निवडणुकीला उभा असतो तेव्हा काही मर्यादा पाळायच्या असतात. त्या मी पाळल्या नाहीत, असं कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवतारे यांनी म्हटलं होतं.
आज अजितदादा महायुतीबरोबर आहेत. ते राज्यातील प्रमुख नेते आहेत. महायुतीतला प्रमुख पक्ष त्यांचा आहे. अतिशय धाडसी, निर्णय क्षमता असणारा त्याचबरोबर अंमलबजावणी करणारा एक नेता महायुतीमध्ये आल्यामुळे दुधात साखर पडली आहे, अशा शब्दांत विजय शिवतारेंनी अजितदादांचं कौतुक केलं.