‘आरटीओ’तील खोळंबा! अधिकारी कामावर, कर्मचारी संपावर
पुणे : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) ८० कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सहभाग घेतला. यामुळे आरटीओतील अनेक विभागांतील कामकाजावर परिणाम झाला. वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन तंदुरुस्ती तपासणी ही कामे मात्र सुरळीतपणे सुरू राहिली.
आरटीओतील वाहतूक, बिगरवाहतूक आणि खटला या विभागांतील कर्मचारी प्रामुख्याने संपात सहभागी झाले. यामुळे वाहन नावावर करणे, वाहनावर कर्जाचा बोजा चढवणे-उतरवणे, वाहतूक परवाना देणे ही कामे झाली नाहीत. याच वेळी खटला विभाग बंद राहिल्याने वाहनांवरील कारवाई आणि दंडाचे कामही झाले नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
आरटीओतील अनेक सेवा ऑनलाइन आहेत. ऑनलाइन सेवांना संपाचा फटका बसला नाही. वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना, पक्का परवाना आणि वाहन तंदुरुस्ती ही कामे आरटीओतील अधिकारी करतात. ते संपात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांची ही कामे सुरळीतपणे सुरू होती. आळंदी रस्ता आणि दिवे घाट येथील कार्यालयांमध्येही कामे नेहमीप्रमाणे सुरू होती.
“आरटीओतील सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नसते. याचबरोबर केवळ कर्मचारी संपावर होते. अधिकारी कामावर असल्याने अनेक कामे सुरळीत सुरू होती. आरटीओच्या कामकाजावर संपाचा फारसा परिणाम झाला नाही.” – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी