जिल्ह्यातील सर्वात कमी मतदार असलेल्या दुर्गम मतदान केंद्र परिसरात मतदान माहिती चिठ्ठीचे वाटप
भोर : भोरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी जिल्ह्यात भोर तालुक्यातील सर्वात कमी मतदार संख्या असलेले दुर्गम मतदान केंद्र बुरुडमाळ परिसराला भेट देवून येथील सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप केले तसेच त्यांना मतदान प्रक्रीयेची आणि मतदान केंद्रातील सुविधांची माहिती दिली.
भाटघर धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील बुरुडमाळ हे मतदान केंद्र अतिशय दुर्गम भागात असून हा परिसर डोंगरांनी व्यापलेला आहे. या मतदान केंद्रावर २१ पुरुष आणि २० महिला असे एकूण ४१ मतदार आहेत. श्री. कचरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठीचे आज वाटप केले. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
बुरुडमाळ येथील ८९ वयाचे बाबूराव आखाडे हे १९६० पासून प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदार केंद्रावर जाऊन मतदान करतात. श्री.कचरे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील मतदान करण्याचे आवाहन केले. आखाडे यांनीदेखील आपण मतदान केंद्रावर येवून मतदान करणार असल्याचे सांगितले. श्री.आखाडे यांचा आदर्श समोर ठेवून नवमतदारांनी आपले पहिले मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन श्री.कचरे यांनी केले आहे.