रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक महेश ढवाण, कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांचा बहिर्जी नाईक पुरस्काराने गौरव
रांजणगाव: रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण आणि पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिशय जटिल गुन्ह्याचा त्यांनी कसून तपास केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराबद्दल रांजणगाव एमआयडीसी व परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाचा खून करुन आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला होता. हा आरोपी खून केल्यानंतर मिळेल तेथे मजूर अड्ड्यांवर काम करीत होता. तो मोबाइल वापरत नसल्याने आरोपीचा शोध घेण्याचे रांजणगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
त्यावेळी कॉन्स्टेबल कुतवळ यांनी वेषांतर करीत हडपसर येथील मजूर अड्डयावर मजूर म्हणून काम करुन शिताफिने आरोपीस अटक केली. त्यांच्या कामगिरीबद्दल रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण आणि उमेश कुतवळ यांना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या हस्ते बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.