सांगवीत तरुणीची आत्महत्या, छेडछाडीला कंटाळून संपवले जीवन; युवतीचे पार्थिव शिरवळ पोलीस स्टेशन समोर आणत पोलीसांविरोधात सांगवी ग्रामस्थांचा संताप
शिरवळ : महिलांवरील अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम करणाऱ्या सावित्री बाई फुलेंची जन्मभूमी असणाऱ्या नायगाव लगतच्याच गावात पीडित मानसी मच्छिंद्र लोखंडे (वय १५ वर्षे) या युवतीला आपले जीवन संपवत न्यायाची मागणी करावी लागल्याने ग्रामस्थांनी युवतीचे पार्थिव ॲम्बुलन्स मधून पोलीस स्टेशन पुढे आणत पोलिसांच्या कामगिरी विरोधात संताप व्यक्त केला. विनयभंग व युवती अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता पोलीस प्रशासनाने स्थापन केलेले निर्भया पथक हे खरोखरीच अस्तित्वात आहे की केवळ कागदावरच आहे? असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे
सांगवी (ता.खंडाळा जि. सातारा) येथे राहणाऱ्या अल्पवयीन मानसीने दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय लांडगे याचे विरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु सदर गुन्ह्यातील आरोपी पंधरा दिवसाच्या आत जामिनावर सुटल्याने भीती व नैराश्यपोटी शनिवार (दि.१६ डिसेंबर) रोजी पहाटे सहा वाजता राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेत व आत्महत्या पूर्वी चिठ्ठीत “अक्षयला शिक्षा करा” हिच शेवटची इच्छा व्यक्त करत तिने आपली जीवन यात्रा संपवली.
सदर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि.२९ रोजी सांगवी ता. खंडाळा येथील युवती पंढरपूर फाटा येथील शाळेमध्ये पायी चालत जात असताना दत्तनगर शिरवळ येथे राहणाऱ्या अक्षय याने तिला गाडी आडवी मारत ” तू मला लय आवडते.. हो का नाही ते सांग,” असे विचारत असताना युवतीने याबाबत “घरी सांगेन” असे म्हणताच त्याने तिचा उजवा हात वाईट हेतूने पकडून मनात लज्जा होईल असे वर्तन केले .
मानसीने आई-वडिलांना सोबत घेऊन शिरवळ पोलीस स्टेशनला जाऊन युवकाविरोधात विनयभंग व पॉक्सोसहित विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. विनयभंग व पॉक्सोसारखा गंभीर गुन्हा दाखल असूनही पंधरा दिवसाच्या कालावधीतच आरोपीला जामीन झाला होता. एवढे होऊनही दि. ३० रोजी सायंकाळी पाच वाजण्याचे सुमारास अक्षय च्या सहकाऱ्यांनी अक्षय लांडगे वर केस केले च्या रागातून तक्रारदार मानसीस शिवीगाळ करीत मुलीचे अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आईचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून केस मागे घेतली नाही तर मुलीला उचलून नेईन असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची तक्रार पीडित युवतीच्या आईने शिरवळ पोलिसात दिली आहे.
सदर गुन्ह्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू असतानाच आरोपी केवळ पंधरा दिवसातच जामीनवर सुटून बाहेर आला व गेली दोन ते तीन दिवसापासून तो मित्रांसह मुलीच्या घराबाहेर मोटरसायकलवर घिरट्या घालत असल्याने मानसीसह तिचे संपूर्ण कुटुंबच दबावात आले असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यामुळे भीती व नैराश्यपोटी पिडीत मानसीने राहत्या घरी पहाटेच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी उठल्यावर युवतीच्या आईस मुलीने साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे निदर्शनास आले. अखेर पोलिसांनी आरोपी अक्षय यास ताब्यात घेतले असून कारवाई चालू असल्याची ग्वाही देत नातेवाईकांना युवतीचा अंतिम संस्कार करण्याची विनंती केली. सांगवी येथे शोकाकुल वातावरणात युवतीचा अंतिम संस्कार विधी करण्यात आला.