भोर विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांनी योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब चांदेरे
मुळशी : राज्य शासनाने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. भोर विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्याचे काम चालू आहे. या मतदार संघात दहा हजार दिव्यांग मतदारांची नोंद करणार असल्याचे मत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी व्यक्त केले.
पौड (ता. मुळशी) येथील पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात दिव्यांग मतदारांसाठी नावनोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी बाळासाहेब चांदेरे बोलत होते. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र कचरे, नायब तहसीलदार पवार, प्रभारी गटविकास अधिकारी संजय ढमाळ, दिव्यांग कल्याण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी भेगडे,असदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण भरम, जिल्हा परिषद निवडणूक अधिकारी नवनाथ चिकणे, विकास गेसणे उपस्थित होते. विकास गेसणे यांनी दिव्यांग मतदार नोंदणी कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती दिली. या शिबिरासाठी तालुक्याच्या कानाकोपर्यातून दिव्यांग बांधव आणि त्यांचा परिवार उपस्थित होता.