दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ४४ गावांसाठी निधीची जिल्हा प्रशासनाची शासनाकडे मागणी; भोर, वेल्हा, मुळशीतील २१ गावांचा समावेश
पुणे : भुस्खलन अथवा दरड कोसळण्याचा धोका असलेल्या पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ७२ गावांपैकी ४४ गावांमध्ये तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. या गावांमध्ये संरक्षण भिंत, वृक्षारोपण, पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करणे आदी कामे करण्यात येणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ७२ गावांमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद केले. यामध्ये प्रामुख्याने ४४ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये भोर तालुक्यातील ४ गावे, मुळशीमध्ये ७ गावे, वेल्हे तालुक्यातील १० गावे, जुन्नरमधील ४ गावे, मावळमधील ८ गावे आणि आंबेगावमधील ११ गावांचा समावेश आहे.
या गावांना असलेला धोका लक्ष्त घेता संरक्षणात्मक कामे व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. या कामांसाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध केला जाणार असून केंद्र सरकार ९० टक्के आणि राज्य सरकार १० टक्के निधी देणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.