घरमालकांनो सावधान..! भाडेकरूची माहिती न देणे आले अंगलट; पौड प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाकडून घरमालकावर गुन्हा दाखल
मुख्य संपादक : दिपक महांगरे
मुळशी : पौड प्रकरणातील आरोपी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास न दिल्याने घरमालक नितीन दिलीप रावडे (वय ४२ वर्ष, रा. पौड, ता. मुळशी) याच्यावर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दहशतवादविरोधी शाखा पुणे ग्रामीण सहायक पोलिस निरीक्षक विशाल शिवाजी गव्हाणे यांनी फिर्याद दिली.
पौड येथील नागेश्वर मंदिरातील मूर्ती विटंबन प्रकरणातील आरोपी नौषाद शादाब शेख व चांद नौषाद शेख (दोघेही मूळ रा. बिजनोर, उत्तर प्रदेश; सध्या रा. पौड, साई हॉस्पिटलचे पाठीमागे) हे दोघेही राहत असलेली खोली रावडे याची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. रावडे हे शेख याच्याकडून दरमहा तीन हजार रुपये भाडे घेत होते. घरमालकाने भाडेकरू बरोबर अकरा महिन्यांचा करारनामा करावा लागतो, तो केलेला नव्हता. तसेच भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्यास देणे राहून गेल्याचे रावडे याने पोलिसांना सांगितले.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार घरमालकाने ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. याबाबत पोलिस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी आवाहनही केले होते. मात्र अल्पशा भाड्यासाठी घरमालक याकडे दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन करतात. भाडेकरूबाबतची माहिती न देता असेच जाणीवपूर्वक उल्लंघन घरमालक नितीन रावडे याने केले. त्यामुळे रावडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस हवालदार सचिन सलगर यांनी सांगितले.