फुरसुंगी-हडपसर खूनप्रकरणात पसार झालेल्या ६ जणांना अटक; हडपसर पोलिसांची कारवाई
हडपसर : फुरसुंगी-हडपसर परिसरात किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई मागण्यास गेलेल्या दुचाकी चालकाच्या खूनप्रकरणात पसार झालेल्या ६ जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली. केवळ दुचाकी घासल्यावरून वाद झाला होता. यानंतर चालक त्याच्या नातेवाईकांसोबत आरोपीकडे नुकसान भरपाईसाठी गेला होता. तेव्हा त्याचा शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.
विलास सुरेश सकट (वय ३८), कैलास सुरेश सकट (वय २०), प्रमोद ज्ञानेश्वर राखपसरे (वय १९), प्रशांत ज्ञानेश्वर राखपसरे (वय २१), सचिन संजय सकट (वय २९) व ज्ञानेश्वर प्रभु राखपसरे (वय ७८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याघटनेत अभिषेक संजय भोसले (वय ३०) याचा खून झाला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक भोसले घटनेच्या दिवशी दुपारी फुरसुंगी येथून दुचाकीवरून जात असताना विलास सकट याच्या वाहनासोबत अपघात झाला होता. या अपघातात अभिषेक यांच्या दुचाकीचा आरसा तुटला होता. तसेच, दुचाकी घासली गेली होती. तेव्हा त्यांच्यात वादावादी झाली.
अभिषेक व त्यांचा एक नातेवाईक रात्री चंदवाडी वस्तीत विलास सकट याच्याकडे अपघातात झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे मागण्यासाठी गेले होते. तेव्हा टोळक्याने त्यांच्याशी वाद घालत त्यांच्यावर धारधार लोखंडी हत्याराने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केला होता. तर, नातेवाईकांवर देखील हल्ला करण्यात आला होता. खूनानंतर हे आरोपी पसार झाले होते.
दरम्यान, पुण्यात दुचाकी घासल्यानंतर वाद आणि वादानंतर भरपाई मागितली म्हणून खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. हडपसर पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. मात्र, आरोपी गेल्या सात दिवसांपासून पसार होते. दरम्यान आरोपी हे बारामती व वाघोली परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने त्यांना दोन्ही ठिकाणांवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, सहाय्यक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे.