स्वराज्याची राजधानी असणाऱ्या वेल्हे तालुक्यात घुसमटतोय तरुणाईचा श्वास – भाग १
वेल्हा : भारत देश एकीकडे महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, महाराष्ट्र राज्यातील एक तालुका मागास यादीत गुदमरुन मात्र आपला जीव गोठत आहे.
महाराष्ट्रातील नामवंत पुणे शहरापासून अवघ्या ५०-६० कि.मी. वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा पाया असणाऱ्या व तब्बल २६ वर्ष स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवलेला असा हा वेल्हा तालुका. तालूक्याला ऐतिहासिक अशा तोरणा आणि राजगड या दोन किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे. नैसर्गीक सामुग्री, डोंगर, दरी, घाट, धबधबे, तांबडी माती असे मनमोहक आकर्षण आहे. डोंगराच्या खाली धुके उतरल्यावर स्वर्गात असल्याचा आभास निर्माण होतो. सुभेदार तानाजी मालुसरेंचे पार्थिव ज्या घाटातून नेले असा ऐतेहासिक मढे घाट हा सुद्धा वेल्हे तालुक्यातच आहे. म्हणून हा तालूका ऐतेहासिक आणि पर्यटन दृष्टया परिपुर्ण असताना कोणतेही विकासात्मक व धोरणात्मक निर्णय घेतलेले नसून पर्यटनस्थळ बनविण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील मावळा फक्त निवडणुका किंवा राजकीय पक्षांसाठी वापरला जातो का? हा यक्षप्रश्न तालुक्यातील युवक उपस्थित करीत आहेत.
“धरण उशाला अन् कोरड घशाला”
वेल्हे तालुका हा साडेतिन चार धरणांनी व्यापलेला आहे. तरीसुद्धा तालुक्यातील काही भागातील महिलांना पाण्यासाठी भीक मागावी लागते. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. भविष्यात धरणातील पाण्यावर केवळ राजकारण होणार का? वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी कसे मिळणार याबाबत तालुक्यातील सत्ताधारी गप्प का? विरोधी पक्षांची भूमिका बजावणारेही पाण्याच्या मूलभूत प्रश्नाबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. ही तालुक्यातील मोठी शोकांतिका तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील तरुणाईचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
वेल्ह्याला रोजगार निर्मितीचे कोणतेही साधन नसल्याने येथील तरुण मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होताना दिसत आहेत. रोजगारासाठी आज तालुक्यातील गावेच्या गावे पुणे मुंबईचा रस्ता पकडत आहेत, स्थलांतरीत झाली आहेत. तालुक्यातील अनेक शेतकरी शेती विकून भूमिहीन होत आहेत. तालुक्यातील हे भयानक वास्तव सत्ताधारी व विरोधकांना कसे दिसत नाही हा मोठा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.
वेल्हा (राजगड) तालुक्यात शिक्षित आणि कल्पक नेतृत्वाचा अभाव आहे. सर्व सामान्य माणसाला जगण्याचा मरण्याची भ्रांत आहे आणि स्वतः ला तालुक्याचे नेतृत्व, भाग्यविधाते म्हणवून घेणारे तथाकथित नेते फक्त स्वतःची घरभरण्या पलिकडे काहीही करत नाहीत. हा कोणाला वाईट ठरवून आपणं चांगलं समजावण्याचा प्रयत्न नाही तर वस्तू स्थिती आहे. ऐतिहासिक पर्यटन स्थळे, समृद्ध वनसंपदा, प्रचंड जलसाठे, आणि हाताला काम नाही म्हणून शहरात जाऊन पोट भरणारी तरुणाई हे चित्र बदलण्यासाठी पहिल्यांदा पोटार्थी राजकारणी बाजुला सारुन सर्व सामान्य कुटुंबातील हुशार, कर्तबगार, प्रश्नांची जाण असणारी तरुणाई राजकारण समाजकारणात सक्रिय झाली पाहिजे हाच वेल्हा तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचा गुरू मंञ आहे.
दत्तात्रय बाळासाहेब देशमाने (मा.शिवसेना तालुका प्रमुख, मा.उपसरपंच, वेल्हा)
गुलामांना गुलामीची जाणिव होणे ही स्वातंत्र्याची पहिली अट आहे. जेव्हा वेल्हा तालुक्यातील लोकांना ही गुलामीची भावना नाडल्याची भावना अप्रगतीची भावना निर्माण होईल तेव्हाच वेल्हा तालुका विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरु करेल.
50-60 वर्ष शिक्षण,आरोग्य ,रोजगार, शेती विकास, पर्यटन विकासासाठी काहीही प्रगती होत नसताना कोणतीही बदल करण्याची, प्रागतिक मानसिकता वेल्हा तालुक्यातील लोकांची नाही. त्यामुळे विकास नजिकच्या काळात केवळ जमिनी विकुनच होईल असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
प्रचंड अंधश्रध्दा आणि जुजबी शिक्षण यामुळे देखील वेल्हा मागे पडला आहे.
आमचे नेते दत्ताभाऊ देशमाने यांनी लिहिलेला हा सुरेख लेख वेल्ह्याचं विदारक वास्तव दर्शन घडवतो आहे, आशा आहे वेल्ह्यातील लोक याची दखल घेतील.