महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची कोटीची फसवणूक; सीआयडी अप्पर पोलिस अधीक्षकास अटक
कोल्हापूर : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाला दारू विक्रीचा परवाना देण्याच्या आमिषाने एक कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण(सीआयडी) अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे (57, मूळ कोल्हापूर, सध्या रा. पुणे) यास रविवारी पहाटे अटक करण्यात आली. कोल्हापूर येथील राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) श्रीमती मनीषा दुबुलेसह पथकाने नाशिक-मुंबई खटवली ठाणे टोल नाका येथे ही कारवाई केली. वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्यावरील कारवाईने राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
संशयित अप्पर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यास रविवारी दुपारी वाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 5 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाने संशयित कोल्हापुरे याचे साथीदार हनुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे, बाळू बाबासाहेब पुरी यांना अटक केली होती. कोल्हापुरे याच्यावरील कारवाईने अटक झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगितले की, महाबळेश्वर (जि. सातारा) येथील मेघदूत हॉटेलचे मालक हेमंत साळवी यांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून मुख्य संशयित हनुमंत मुंडे, श्रीकांत कोल्हापुरे व अन्य संशयितांनी दोन कोटी 50 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी साळवी यांच्याकडून एक कोटी पाच लाख रुपये वेळोवेळी रोखीने व धनादेशद्वारे वसूल केले. एक कोटीहून अधिक रक्कम घेऊनही दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्यास संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. हॉटेल व्यावसायिकाची भेट घेण्यास अथवा सपर्क साधण्यासही टाळाटाळ झाल्याने साळवी यांनी जुलै 2024 मध्ये कोल्हापूरे, मुंडेसह अन्य संशयितांविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
राज्य गुन्हे अन्वेषणचे पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी पोलिस अधीक्षक (सीआयडी) श्रीमती मनीषा दुबुले यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला. या पथकाने कारवाई केली. फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल होताच कोल्हापुरे याने अटक टाळण्यासाठी न्यायालयातही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. तपास पथकाला चकवा देत त्याने पुणे, मुंबईसह ठाण्यातही आश्रय घेतल्याची माहिती निष्पन्न झाली होती. ठाण्यातील खटवली परिसरातील टोल नाका येथे त्याचे वास्तव्य असल्याची माहिती लागताच पथकाने अटक केल्याचेही दुबुले यांनी सांगितले.