खंडाळ्यातील सुप्रसिद्ध सराफाने सोन्याचे बिस्कीट देण्याच्या बहाण्याने केली माजी सैनिकाची तब्बल ३१ लाख रुपयांची फसवणूक
खंडाळा : सोन्याचे बिस्किट बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल ३१ लाख २ हजार ३४८ रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी रामदास किसन रामगुडे(मूळ रा.बावडा ता. खंडाळा सध्या रा.रणदुल्लाबाद ता. कोरेगाव) यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, वैभव गोल्डन ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर व त्याची पत्नी नीलम वैभव धामणकर(दोघेही रा. खंडाळा) या दोघांनी सैन्य दलातील सेवानिवृत्त रामदास रामगुडे यांना सोन्याचे बिस्किट व दागिने करून देतो असे सांगत मैत्रीपूर्ण संबंधातून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या दांपत्याने २००९ ते २०१९ या कालावधीत किसन रामुगडे यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ३१ लाख २ हजार २४८ रुपये इतकी रक्कम घेतली. परंतू, त्या बदल्यात रामगुडे यांना सोन्याचे दागिने किंवा बिस्किट काहीच दिले नाही. या सर्व प्रकारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याचे रामगुडे यांच्या लक्षात आले. संबंधित ज्वेलर्स मालकाकडून इतर लोकांचीही आर्थिक फसवणूक झाल्याचे कळाल्याने रामगुडे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत रामदास रामगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैभव धामणकर व नीलम धामणकर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके करीत आहेत.