पुणे जिल्ह्यात ८२१३ मतदान केंद्रे निश्चित; भोरमध्ये सर्वाधिक ५६१ मतदान केंद्रे

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात ८ हजार २१३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी नव्याने १ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.

सुमारे दीड हजार मतदारांसाठी एक मतदान केंद्र याप्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे.

पुणे जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदार संघ आहेत. मागील लोकसभेला जिल्ह्यात ८ हजार १७५ मतदान केंद्रे होती, त्यामध्ये यंदा ३८ ने वाढ होऊन ८२१३ मतदान केंद्रे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात निश्चित करण्यात आली होती. मात्र, शहरासह जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली.

Advertisement

त्यानंतर ९ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणी, नाव वगळणी आणि पत्त्यातील दुरुस्ती याबाबतचे तब्बल दोन लाख तीन हजार ११९ अर्ज जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक लाख चार हजार ४६४ अर्ज हे केवळ मतदार नोंदणीचे आहेत. या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांत आणखी वाढ होणार जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एका मतदान खोलीवर १५०० मतदार मतदान करू शकणार आहेत, त्यापुढील मतदारांना त्याच मतदान केंद्रावर दुसऱ्या खोलीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे एकाच मतदान खोलीवर मतदारांची गर्दी, रांगा लागणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विधानसभा मतदारसंघनिहाय केंद्र संख्या

जुन्नर – ३५६, आंबेगाव – ३३८, खेड – ३८५, शिरूर – ४०५, दौंड – ३०९, इंदापूर – ३२९, बारामती – ३७६, पुरंदर – ४१०, भोर – ५६१, मावळ, मुळशी ३८१, वेल्हा, चिंचवड – ५२८, पिंपरी – ३९९, भोसरी – ४६४, वडगाव शेरी – ४५२, खडकवासला – ४६५, शिवाजीनगर – २८०, कोथरूड – ३९८, पर्वती – ३४४, कसबा – २७०, हडपसर – ४९४ आणि पुणे कॅन्टोन्मेंट – २७४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page