श्री क्षेत्र नारायणपूरच्या उत्सव सोहळयाची तयारी पूर्ण; गिरणार पर्वतापासून विविध महासागर, नर्मदा ते कन्याकुमारी पर्यंतच्या नदयांचे पाणी घेवून शिष्यगण मार्गस्थ
पुरंदर : देशाचे चारही दिशेला चार धाम निर्मितीचे संकल्प पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच होणारा दत्त जयंती सोहळा विश्व चैतन्य सदगुरू नारायण उर्फ आण्णा महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दत्त सेवेकरी मंडळ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती दत्त सेवेकरी मंडळ यांनी दिली.
श्री. क्षेत्र नारायणपूर येथे रविवार दि.२४ डिसेंबर २०२३ पासून भव्य दत्त जयंती सोहळा साजरा होत असून सोमवार दि.२५ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे दाखल होणा-या पायी दिडयांचे स्वागत तर सायंकाळी सात वाजून तीन मिनीटांनी दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे. मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी पालखी ग्रामप्रदक्षिणा व दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळयासाठी चारीधामातील शिष्यगण तसेच भाविक उपस्थित राहणार असून हा उत्सव चार धाम संकल्पपुर्ततेनंतर तसेच अमेरिकेत होणा-या परदेशातील पहिल्या दत्त मंदीराचे निर्मिती शुभारंभ झाल्यानंतर उत्साह व देशभरातील दत्त भक्तांच्यासाठी श्रीक्षेत्र नारायणपूर एक लोकसोहळयाचे केंद्र ठरणार आहे, अशी माहिती दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर यांनी दिली आहे.
श्री. क्षेत्र नारायणपूर जि. पुणे येथील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला सहा दशकापासून साधना व उपासना करून सिद्ध झालेले श्री. दत्त संस्थान आज देशाच्या चारही दिशेला पोहचले असून एकमुखी दत्त महाराज व सदगुरू आण्णा महाराजांची मानव देहातील उर्जा व प्रवचनातून मिळणारी संस्कार शाळा जात, धर्म, भाषा यापलिकडे जावून पोहचवली आहे. म्हणूनच मानसातील माणूस जागा करणारे व या राज्यातील माणूस त्या राज्यातील माणसापर्यंत समाविष्ठ झाला असून या हृदयीचे त्या हृदयी माणूस जोड अभियानाचे संकल्पमुर्ती म्हणजे श्री. सदगुरू आण्णा महाराज होय.
या दत्त जयंती सोहळ्यासाठी गिरणार पर्वतापासून विविध महासागर, नर्मदा नदीपासून कन्याकुमारी पर्यतच्या नदयांचे पाणी पायी घेवून शिष्यगण मार्गस्थ झाले आहेत. सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ दुपारपर्यंत श्री क्षेत्रनारायणपूर येथे पोहचतील असा हा मानसांचा उत्साह व उत्सव पाहून स्वर्गलोक श्री. क्षेत्रनारायणपूर येथे अनुभवन्यासाठी सर्व दत्त भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर यांनी केले आहे.