मुंबईला कसं यायचं, काय घ्यायचं? मनोज जरांगेंची नियमावली, २० महत्त्वाचे मुद्दे
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क: मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची घोषणा केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय.
या मोर्चाची सुरुवात २० जानेवारी रोजी होणार आहे. मुंबईला पायी मोर्चा कुठून कुठेपर्यंत आणि कधी निघणार याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटी इथून निघायचं असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
जरांगे पाटील यांची अशी आहे नियमावली
१) २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबईला जाणार
२) जरांगे यांच्याकडून मुंबईला जाण्याच्या पायी मार्गाची घोषणा
३) अंतरवालीहुन शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी, अहमदनगर, सुपा शिरूर, रांजणगाव वाघोली, लोणावळा पनवेल, वाशी, चेंबूरमार्गे आझाद मैदान शिवाजी पार्कवर जाणार
४) सगळ्यांनी आचारसंहिता पाळूनच पायी यात्रेत सहभागी व्हावं. आपलं रक्षण आपणच करायचं आहे. मराठा समाज मुंग्यांसारखा पायी यात्रेत सहभागी झाला पाहिजे.
५) कुणीही घरी थांबू नका. पायी यात्रेत सहभागी व्हा
६) अंतरवालीतील एक टीम मैदानाची पाहणी करण्यासाठी उद्या मुंबईला जाणार
७) पायी यात्रा ज्या गावातून जाईल त्या गावातील लोकांनी सहकार्य करावे. पाण्याची व्यवस्था करावी.
८) जे पायी मुंबईला येतील त्यांनी गाडीला घर बनवावं.
९) सगळ्या वस्तू सोबत घेऊनच चला. कशाचीही कमतरता पडणार नाही याची काळजी घ्या
१०) सर्व आंदोलकांना मोर्चाचं नियोजन पाठवणार, औषध गोळ्याही सोबत असू द्या
११) मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने स्वयंसेवक व्हावे. कुणीही मध्ये व्यसन करायचं नाही.
१२) पायी मोर्चात शांतता असली पाहिजे उद्रेक नको,आंदोलन शांततेतच झालं पाहिजे
१३) पायी मोर्चात आनंदाने सहभागी व्हा,अशी संधी गेली तर पुन्हा येणार नाही.त्यामुळे मराठ्यांमध्ये उत्साह आहे तो कायम असला पाहिजे
१४) गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्यांचा खर्च करावा, पायी मोर्चाच्या नावाखाली कुणीही पैसे देऊ नका. दिले असतील तर माघारी घ्या.
१५) एक महिन्यापेक्षा जास्त सामान पुरेल एवढं सामान सोबत घ्या.
१६) ट्रॅक्टरच्या मुंडक्यासोबत ट्रॉलीही घ्या, ट्रॉलीला छत बनवा.
१७) पायी मोर्चात अडीच ते ३ लाख स्वयंसेवक असतील
१८)ना नफा ना तोटा तत्वावर झुणका भाकर केंद्र,चहा विक्रेते यांनी सेवा द्यावी.
१९) मोर्चात महिलांची स्पेशल तुकडी असेल
२०) यात्रेला अजून नाव दिले नाही पण नक्की देऊ आज फक्त रूट सांगितला आहे.
१६) क्युरेटीव्ह पिटीशनच सगळं श्रेय हे गोरगरीब मराठ्यांच आहे.हे माय बापाचं श्रेय आहे मराठा आणि कुणबी एकच असल्यानं कायदा पारीत करा आणि ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊन टाका. सरकारने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे हेही आरक्षण आपण घ्यायला तयार पण हे आरक्षण टिकेल का हे सरकरने जाहीर करावं. मराठा समाजाने आता सज्ज व्हावे गाफील राहू नका. आतापर्यंत ५४ लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं हे तुमच्या एकजुटीने प्राप्त झालं. जालन्यात एका नोंदीवर ७० जणांना लाभ मिळाला ५४ लाख नोंदींमुळे २ कोटी लोकांना लाभ होईल. परीक्षा पास होऊनही नियुक्त्या नाही मिळाल्या त्यामूळे मराठ्यांचे पोरं बरबाद झाले माझ्याकडे काही विद्यार्थिनी येऊन रडल्या त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांच्या कानावर टाकला आहे. तो ही प्रश्न मिटेल, असंही जरांगे म्हणाले.
आम्ही ओबीसी आरक्षणातच आहोत. त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं. सरकारने एकदाचा कायदा पारीत करावा आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाका, असंही जरांगे म्हणाले.