खेड शिवापूर व कामथडी येथील अपघात मृत्यू प्रकरणी २ अज्ञात वाहन चालकांविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
नसरापूर : गिरीस्पर्श सोसायटी (खेडशिवापूर ता. हवेली जि.पुणे) समोर पुणे-सातारा महामार्गावर रोड क्रॉस करीत असताना ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नितीन रामचंद्र कोंडे (वय ४६ वर्षे, रा. खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून या अपघातात एका अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन अपघात करून अपघातात चुलत भावाच्या डोक्यास गंभीर दुखापती करून त्याच्या मृत्युस कारणीभूत होवुन तो अपघाताची खबर न देता पळुन गेला. म्हणून अज्ञात चालकाविरूध्द अक्षय पोपटराव कोंडे (वय ३१ वर्षे, रा. खेडशिवापूर ता, हवेली, जि.पुणे) यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालका विरुद्ध आज गुरुवारी (दि. २८ डिसेंबर) दुपारी १ वाजता राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार किर्वे करीत आहेत.
तसेच कामथडी (ता. भोर, जि. पुणे) गावच्या हद्दित पुणे-सातारा महामर्गलागत देगाव फाटा येथे दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी अफसरपाशा दादापाशा पाटील (वय ५७ वर्षे, आंबेगाव बु., कात्रज, पुणे) हे त्यांची मोटार सायकल (एम.एच ४२ ए.जे २३५७) वरून पुणे कडून सातारा कडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे व अपघाताची कोणतीही खबर नजीकच्या पोलीस स्टेशनला न देता अज्ञात वाहनावरील अज्ञात चालक पळुन गेल्यामुळे चालकाविरुद्ध नाजनीन अफसरपाशा पाटील (वय २५ वर्षे आंबेगाव बु., कात्रज, पुणे) यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध आज गुरुवारी (दि. २८ डिसेंबर) दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार ढावरे करीत आहेत.