नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेल्ह्यातील पर्यटनस्थळे सज्ज; सहकुटुंब अवश्य भेट द्या.
नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करणार – रणजित पठारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वेल्हे पोलीस स्टेशन
वेल्हा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेल्ह्यातील पानशेत, वरसगाव, गुंजवणी, राजगड, तोरणा, मढेघाट, आदी पर्यटनस्थळां सोबतच हॉटेल, फार्म हाऊस सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी उद्या रविवारी (दि. ३१ डिसेंबर) मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे. पानशेत, राजगड, तोरणा, मढेघाट परिसरात पर्यटकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर वेल्हे पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली आहे. या सर्व पर्यटन स्थळांवर नजर ठेवण्यासाठी वेल्हे ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक महेश कदम, ज्ञानदीप धिवार, औदुंबर आडवाल, अजय शिंदे, कांतीलाल कोळपे आदींसह पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे म्हणाले, नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. सर्व पार्ट्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. पानशेत, वरसगाव, राजगड, तोरणा, मढेघाट मार्गावर तपासणी नाके उभारली आहेत. तसेच पर्यटनस्थळां सोबतच हॉटेल, फार्म हाऊस वरील नियमांचे उल्लंघन करणार्या पर्यटकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गडावर मुक्कामास मनाई
राजगड, तोरणा आदी गडकोटांवर पर्यटकांना मुक्कामास मनाई करण्यात आली आहे. गडावर कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी पहारेकरी, सुरक्षा रक्षक पुरातत्व विभागाने तैनात केले आहेत.