वेळू हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळीतील ३ आरोपी राजगड पोलिसांच्या ताब्यात
खेड शिवापूर : वेळु(ता.भोर) गावच्या हद्दीतील आर.ए. इंडीया गोडाउन येथील पार्कीगमध्ये लावलेल्या कंटेनरच्या डिझेलच्या टाकीतुन २३० लिटर डिझेल चोरी करणाऱ्या ६ पैकी ३ आरोपींना राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींना आज गुरुवारी(दि. १ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २९ फेब्रुवारी रोजी पहाटे २ वाजता वेळु(ता.भोर) गावच्या हद्दीतील आर.ए. इंडीया गोडाउन येथील पार्कीगमध्ये लावलेल्या कंटेनरच्या(एम.एच.४६. बी.एफ.३५३३) डिझेलच्या टाकीतुन २३० लिटर डिझेल चोरी झाली होती. या चोरीबाबत राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यादरम्यान या घटनेचा तपास राजगड पोलिसांकडून सुरू असताना या गुन्ह्यातील काही आरोपींना भुईंज पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील एका गुन्ह्यात पकडुन त्यांची रवानगी सातारा जिल्हा कारागृह येथे केली.
वेळु(ता.भोर) येथील डिझेल चोरीत गणेश राजु कोटे(वय १९ वर्ष, रा. तुळजापुर), रवि नवनाथ पारधे(वय २० वर्ष, रा. तुळजापुर), बबलु उमेश राठोड(वय १९ वर्ष, रा. तुळजापुर), दत्तात्रय महारूद्र लोहार(वय २६ वर्ष, रा. खेड शिवापुर), सागर उर्फ सोन्या शामजी पवार(रा. खेड शिवापुर) रोहीत बळीराम शेंडगे(रा. खेडशिवापुर) यांचा सहभाग असल्याचे राजगड पोलिसांना तपासात निष्पन्न झाले होते. यामधील गणेश कोटे, रवि पारधे, बबलु राठोड हे आरोपी सातारा जिल्हा कारागृह मध्ये असल्याची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी कारागृहास विनंती करून चोरीबाबत अधिक तपास करण्यासाठी या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना आज गुरुवारी(दि. १ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.