वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांना अवघ्या सहा महिन्यात पोलिसांनी ठोकला तब्बल ४७ कोटी रुपयांचा दंड
पुणे : गेल्या सहा महिन्यात(१ जानेवारी ते २१ जुलै) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी तब्बल ४७ कोटी रुपयांचा दंड ठोकला आहे. सुविधा न मिळण्यासोबत प्रचंड वाहतूक कोंडीतून वाट काढताना पुणेकरांना दंडाचा देखील त्रास सहन करावा लागत आहे.
तब्बल ५ लाख ८६ हजार ३९४ वाहनांवर कारवाई
गेल्या सहा महिन्यात पुणे पोलिसांनी तब्बल ५ लाख ८६ हजार ३९४ वाहनांवर कारवाईकरत त्यांना ४७ कोटी ३१ लाख ५६ हजार २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. त्यातील १३ कोटी ४४ लाख ३२ हजार १०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तर, ३३ कोटी ८७ लाख २४ हजार १०० रुपयांचा दंड प्रलंबित आहे.
सीसीटीव्ही वरून मोठ्या प्रमाणावर कारवाई
राज्यासह देशातील पहिले सीसीटीव्हीने कैद झालेले सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख झाली होती. परंतु, या सीसीटीव्हीचा उपयोग सर्वाधिक वाहतूक पोलिसांना अन् नुकसान पुणेकरांचे होत असल्याचे आतापर्यंत दिसत आहे. कारण, सीसीटीव्ही बसविल्यानंतर वाहतूक पोलिसांची कारवाई चारपट वाढल्याचे दिसते.
हेल्मेटची सर्वाधिक कारवाई
सीसीटीव्हीवरून कारवाई सुरू केल्यानंतर पोलिसांनी सर्वाधिक कारवाई ही हेल्मेटचीच केल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसत आहे. केवळ ६ महिन्यात पोलिसांनी हेल्मेट न परिधान करणाऱ्या १ लाख १७ हजार ११८ वाहन चालकांवर कारवाई केली आहे. हेल्मेट सक्तीचाच सर्वाधिक दंडही दरवर्षी पुणेकरांना ठोकला जातो.
वाहनावर झालेल्या कारवाईची संख्या
राँग साईड – १८,७३१ वाहनांवर कारवाई
राँग नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट – ९३१ वाहनांवर कारवाई
सिग्नल जपींग – ३०,३०० वाहनांवर कारवाई
ड्रंक अँड ड्राईव्ह – १९५३ वाहनांवर कारवाई
सायकल ट्रॅक किंवा फुटपाथवरून वाहन चालवणे – १९२९ वाहनांवर कारवाई
ट्रिपल शीट – १९,२३४ वाहनांवर कारवाई
रॅश ड्रायव्हींग – ४१२० वाहनांवर कारवाई