भोर – दिडघर येथे अवैध गावठी पिस्तूल लावून दहशत करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद 

नसरापूर : भोर तालुक्यातील दिडघर येथे अवैध गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तीन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी केली असून याबाबत संकेत गोरख चोरघे(वय २१ वर्ष, सध्या रा. आंबेगाव पठार, ता. हवेली, मुळ रा. कोळवाडी ता. राजगड(वेल्हे) जि.पुणे) या तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध रित्या गावठी पिस्तूल, कट्टा बाळगून त्याचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले असल्याने त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी(दि. २० सप्टेंबर) राजगड पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दिडघर(ता. भोर) येथे एक तरुण कंबरेला गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्या बाबतची गोपनीय माहिती पथकातील अमंलदार अमोल शेडगे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी धाव घेऊन संकेत चोरघे या तरुणास एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. सदर गावठी पिस्तूल बाबत तरुणाकडे विचारपुस केली असता त्याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याची खात्री झाल्यानंतर गावठी पिस्तूल व तीन काडतूस असा एकूण ३६ हजर ५०० रुपयांचा मुद्देमाल या तरुणांकडून पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन या तरुणावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

Advertisement

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार हनुमंत पासलकर, रामदास बाबर, अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, सागर नामदास यांनी केली असून पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page