भोरला स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक संघटनेचे धरणे आंदोलन
भोर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भोर तालुका स्वस्त धान्य व केरोसीन परवानाधारक संघटनेने गुरुवारी(दि.२७ जून) एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
भोर येथील राजवाडा चौकात सर्व संघटनेच्या पदाधिकारी व सर्व दुकानदार यांनी एकत्र येऊन आंदोलन करीत जोरदार घोषणा दिल्या. राज्य शासनाने संघटनेच्या विविध मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी एक मुखाने केली गेली. राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये आजच्या महागाई निर्देशांकानुसार किमान १०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करण्यात यावी. शासकीय धान्य गोदामातून देण्यात येणारे अन्नधान्य हे केवळ जूट बारदान मध्येच देण्यात यावे. ५० किलोच्या प्लास्टिक पिशवीमध्ये अन्नधान्य देण्यात येऊ नये.
तसेच संपूर्ण राज्यांमध्ये अंत्योदय योजनेतील सात पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या साधारण ९० हजार शिधापत्रिका अंत्योदय ऐवजी प्राधान्य कुटुंब योजनेत वर्ग करण्यात याव्यात. तसेच या आणि इतर मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार पुनम अहिरे, नायब तहसीलदार महसूल अजिनाथ गाजरे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल, तालुकाध्यक्ष मनोज खोपडे, अब्दुल शेख, बबनराव भगत, नरेंद्र मोदी, शंकरराव खोपडे, प्रदीप मोहिते, कुमार साळुंखे, शेखर पिसाळ, सोमनाथ निगडे, हनुमंत पवार, मिलिंद आवाळे आदींसह रेशनिंग दुकानदार उपस्थित होते.