भोर तालुक्यातील कामथडी येथे पुणे-सातारा महामार्गालगत अज्ञात वाहनाच्या धडकेत १ माकड जागीच ठार तर १ जखमी
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गालगत भोर तालुक्यातील कामथडी येथे आज गुरुवार(दि.९ नोव्हेंबर) रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक माकड ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
स्थानिक नागरिक प्रवीण कदम यांनी पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन हवेली तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांना फोनद्वारे संपर्क साधत अज्ञात वाहनाने दोन माकडांना धडक दिल्याचे कळवले.घटनेची माहिती कळताच तत्काळ संतोष पाटील नसरापूर येथील अनुभवी सर्पमित्र विशाल शिंदे,श्रीकांत खेडकर,विलास धोंगडे सुरज शिंदे,राहुल जाधव यांचेसह घटनास्थळी दाखल झाले.मात्र दोन माकडांपैकी एक माकड जागीच ठार तर जखमी अवस्थेतील दुसरे माकड बेशुद्धावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.बेशुद्धावस्थेतील माकडाच्या तोंडावर पाणी मारले असता ते उठून पळून गेले.मात्र गंभीररीत्या जखमी माकडाला वाचविण्यात वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्रांना अपयश आले. मृत माकडाला सागर आखाडे यांचेकडे सोपविण्यात आले.मात्र पाण्याच्या शोधात आलेल्या वन्य प्राण्यांना राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा जीव गमवावा लागतो. त्यामुळे वन विभागाने योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र विशाल शिंदे यांनी केली आहे.