व्हॉट्सॲप ग्रुप वर राजकीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांनो सावधान! पालकमंत्री शंभूराज देसाईंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या शिवसेना तालुका प्रमुखाला अटक
सातारा(प्रतिनिधी) : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहणाऱ्या शिवसेनेतील (शिंदे गट) तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव (रा.मुंढे, ता.कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी जाधव यांना अटक देखील केली आहे.
या प्रकरणातून शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ‘शिवसेना एकनाथजी शिंदे ग्रुप’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराड तालुक्यात शिंदे गटातील मोठ मोठ्या पदावरील नेते, शिवसैनिक आहेत. यात तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव देखील ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपवर जाधवांनी पोस्ट केली की, शंभूराज देसाई हे मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन फसवत आहेत. याशिवाय काकसाहेब जाधवांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. या व्हॉट्सॲप ग्रुपवरील गुलाबराव शिंदे यांच्या तक्रारीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकासाहेब जाधव यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरुन शंभूराज देसाईंची सोशल मीडियावर बदनामी केली आहे, असे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी काकासाहेब जाधव यांना अटक केली आहे. एकेकाळी काकासाहेब जाधव हे शंभूराज देसाई यांचे निकट वर्तीय मानले जात होते. आता शंभूराज देसाईंच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातील अंगर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी करीत आहेत.