भोर तालुक्यातील जर्मन शेतकऱ्याची यशोगाथा; खडकाळ माळावर फुलवलं नंदनवन! वॉकीटॉकी, इन्फ्रास्ट्रक्चर, लोकल ते ग्लोबल जर्मन दाम्पत्याची गोष्ट वाचा सविस्तर
भोर : जर्मनीचं एक जोडपं भारतात आलं आणि पुण्यापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कांबरे या गावातील पडीक आणि डोंगरउतारावर असलेल्या माळरानावर जवळपास १२ ते १३ कोटी रूपये खर्चून एकात्मिक सेंद्रीय शेतीचं नंदनवन फुलवलं. एका शेतीमध्ये जवळपास ५० प्रकारचे प्रयोग यांनी केले आहेत. सात एकर शेतात तब्बल २४० प्रकारची ३५ हजार झाडे, सेंद्रीय पद्धत, शेतातील नैसर्गिक तळे, पाणी व्यवस्थापन, २६ कामगार, प्रत्येकाकडे वॉकीटॉकी आणि एकंदरीत शेती व्यवस्थापन पाहून डोकं सुन्न पडतं.
मुळचे जर्मनीचे असलेले आणि पुण्यात येऊन स्थायिक झालेले जॉन मायकल(वय ६८ वर्षे) आणि अंजी मायकल (वय ६० वर्षे). मागच्या चार वर्षांपासून हे दाम्पत्य भोर तालुक्यातील कांबरे गावात सेंद्रीय शेती आणि विविध प्रयोग करत आहे. नोकरीनिमित्त भारतात आलेले दोघे इथेच रमले अन् समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने शेती करायला सुरूवात केली. अनुभवाच्या जोरावर वयाची साठी पार केलेल्या या जोडप्याने इथे निसर्गाचं नंदनवन फुलवलंय.
साधारण दहा वर्षापूर्वी जॉन मायकल आणि अंजी हे जोडपे पुण्यात नोकरीनिमित्त आले होते. नोकरी करत असताना त्यांना भारतातील सेंद्रीय शेतीची आवड निर्माण झाली आणि पुढे कांबरे या गावात शेतजमीन विकत घेऊन कांबरे ॲग्रो इंडस्ट्रीज या नावाने कंपनी स्थापन केली. जमीन घेतली त्यावेळी तब्बल २० हजार झाडे आणि नंतरचे मिळून ३५ हजार झाडे यांनी शेतात लावली होती. डोंगरउतारावरील शेती असल्याने पाणी थांबायला मार्ग नव्हता. शेतात तळं बांधलं होतं पण ते पाणी शेताला देण्यासाठी लाईटची गरज होती. मग त्यांनी सामान वाहण्यासाठी उपयोगात असणाऱ्या कंटेनरपासून तयार केलेल्या घरावर सौरउर्जेच्या प्लेट टाकल्या आणि शेतासाठी आणि रोजच्या वापरासाठी लागणारी सगळीच वीज तयार केली. एवढंच नाही तर शेतीच्या उंचवट्यावर चार पाच ठिकाणी टाक्या तयार करून कोणत्याही प्रकारची उर्जा न वापरता शेतात पाणी देण्याचं तंत्र यांनी तयार केलंय. काम्बाफार्म असं या प्रकल्पाला नाव दिलंय. येथे शेतीसाठी संपूर्णपणे नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जातो. कांबरे ॲग्रोच्या माध्यमातून जवळपास ३० स्थानिक महिला आणि पुरूषांना रोजगार मिळालाय.
शेतात लावलेली तब्बल ३५ हजार झाडे फक्त सेंद्रीय पद्धतीने वाढवले जातात. वेगवेगळ्या प्रकारे जीवामृत तयार करून झाडांना दिलं जातं. शेतातील झाडांच्या पानांचा आणि गवताचा वापर करून केलेलं मल्चिंग पाहून थक्क व्हायला होतं. शेतातील झाडाची एक काडीही इथे वाया जात नाही हे विशेष. लाकडाचे तुकडे करून ते पुन्हा शेतात टाकले जातात. लाकडाच्या भुशामुळे शेतीला आवश्यक ते मुलद्रव्ये मिळतातंच पण गवताच्या अच्छादनामुळे शेतीची धूप थांबते, शेतीला पाणीही कमी लागते आणि तणही होत नाही. कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जात नसल्याने इथे जैवविविधता पाहायला मिळते. जवळपास ४० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि नाना प्रकारच्या सापांचा वावर या शेतात आहे.
मियावाकी आणि सिंट्रोपीक शेतीचा एक यशस्वी प्रयोग आहे हा. बांबू, साग, ऑस्ट्रेलियन साग, निलगिरी, आंबा, करंज, वड, पिंपळ, अर्जुन, केळी, अननस, फणस, पपई, फुलझाडे, शेवरी, बाभूळ अशी जवळपास २४० प्रकारचे झाडं इथे आहेत. झाडांच्या वाढीसाठी केली जाणारी कटिंग आणि सपोर्ट प्लॅटिंगचं तंत्र वाखाणण्याजोगं आहे. एवढी झाडे असतानाही प्रत्येक झाडाकडे कामगारांचं लक्ष असतं हे विशेष.
बिया तयार करणे, त्यापासून रोपे बनवणे, एकात्मिक पद्धतीने फळझाडांची लागवड करणे अन् पूर्णपणे सेंद्रीय खतांचा वापर करून त्यांना वाढवणे अशी येथील कामाची पद्धत आहे. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, रानभाज्या, वनझाडे, फुलझाडे अशा वेगवेगळ्या झाडांचा सामावेश आहे. ही सगळी झाडे जिवामृत आणि लेंडीखतावर वाढवले जातात. कोणत्याही प्रकारच्या रसायनिक खतांचा आणि फवारणीसाठी केमिकलचा वापर येथे केला जात नाही. शेतातील काडीकचरा, पाला आणि लाकूड कापून शेतातच कुजवले जाते. त्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि माती भुसभुशीत होऊन सुपिकता वाढण्यास मदत होते.
येथील अनेक झाडे अजून लहान असल्याने त्याला फळधारणा झाली नाही. तर काही झाडांना कमी वेळेतच उत्पादन सुरू झाले आहे. या फळांवर किंवा पालेभाज्यांवर प्रक्रिया करून जवळपास ७ ते ८ प्रकारचे उत्पादने कांबरे ॲग्रो मार्फत बनवली जातात. त्यामध्ये अंबाडी जाम, हळदी पावडर, पेरू जाम, करवंद जाम, जांभूळ ज्यूस, लिंबू सरबत, पेरू सरबत, करवंद सरबत ही उत्पादने बनवली जातात.
शेतजमिनीचा विकास करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा मायकल यांनी चांगल्या पद्धतीने निर्माण केल्या आहेत. येथील शेतीकामाचं, पाण्याचं एकंदरीत व्यवस्थापन म्हणजे एक विलक्षण अनुभव. डोंगराच्या तीव्र उतारावर असलेल्या शेतजमीनीला ताली (बांध) घालून खूप छान पद्धतीने तीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर या शेतामध्ये तीन पाझर तलाव आहेत. तीन तलावातून पाणी पाझरून सर्वांत खाली असलेल्या विहिरीत जाते आणि तिथून ते पुन्हा उंचीवर ठेवलेल्या टाक्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही. शेतीला पाणी देण्यासाठी सौरउर्जेचा वापर केला जातो. तर ठिंबकद्वारे पाणी देण्यासाठी कोणत्याही लाईटचा वापर न करता उताराचा वापर केला जातो.
कामाच्या व्यवस्थापनासाठी येथील कामगारांकडे चक्क वॉकीटॉकी पाहायला मिळतात. ऑफिसमध्ये बसून कामगारांना काम सांगितले जाते किंवा दुसऱ्या टोकाला असलेल्या कामगारांशी या माध्यमातून संपर्क साधला जातो. त्याचबरोबर मोबाईलवर संपर्क साधण्यासाठी या गावात नेटवर्कची समस्या असल्यामुळे वॉकीटॉकी फायद्याचे ठरतात. या व्यवस्थेमुळे वेळ आणि कष्ट वाचते आणि कामाचे योग्य व्यवस्थापन होते.
जर्मन दुतावासाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यावर मायकल आणि ऍन्जीन्जी यांना २०१९ मध्ये दहा वर्षासाठी भारतीय नागरिकत्व मिळाले, मात्र त्यासाठी दहा कोटी रुपयांची गुंतवणूक आणि किमान २० लोकांना रोजगाराची अट होती. जन्माने जर्मन असणाऱ्या या दोघांनीही भारतीय नागरीकत्व स्वीकारले. आयुष्यभर कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर या दोघांनी भारतात शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व नियम व अटी पुर्ण करुन २०१९ पासून हे दोघे कांबरे गावात स्थायिक आहेत.
कामगारांच्या मुलांची शिक्षणाची आणि आरोग्याची सोय
इतर कंपन्यांसारखी येथील शेतीत काम करणाऱ्या कामगारांची काळजी घेतली जाते. सर्व कामगारांचा विमा कांबरे ॲग्रो या कंपनीकडून काढण्यात आला आहे. यामुळे कामगारांचा दवाखान्याचा मोठा खर्च वाचतो आणि आरोग्याची काळजी मिटते. त्याचबरोबर कामगारांच्या मुलांच्या १२ वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्चही कंपनीकडून केला जातो. त्यांना लागणाऱ्या शालेय वस्तू आणि फी कंपनीकडून दिली जाते. या सुविधा कामगारांना दिल्या जात असल्यामुळे येथील कामगार समाधानी असल्याचं सांगतात. निश्चितच जर्मनीच्या या दांपत्याने पुण्याच्या मातीत केलेली ही सेंद्रिय शेती आणि त्यांचे सामाजिक कार्य इतरांसाठी देखील प्रेरक ठरणार आहे यात शंकाच नाही.