भोर विधानसभेत महायुतीला बंडखोरीचे ग्रहण; तिनही पक्षातील प्रमुख नेत्यांनी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाला दाखवला कात्रजचा घाट, भरले अपक्ष उमेदवारी अर्ज
भोर : विधानसभा निवडणुकीसाठी भोर मतदारसंघातून महायुतीकडून गेली अनेक दिवस उमेदवार गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. यामुळे उमेदवार नक्की कोण होणार? महायुतीत भोरची जागा कोणत्या पक्षाला मिळणार? याबाबत भोर-राजगड-मुळशीतील जनतेची उत्सुकता शिगेला लागली होती. याबाबत सोमवारी(दि. २८ ऑक्टोबर) महायुतीकडून भोर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकरांचे नाव जाहीर करण्यात आले. शंकर मांडेकर हे यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख होते. महायुतीच्या तिनही पक्षातील निष्ठावंत उमेदवारांना डावलून आयातांना उमेदवारी दिल्यामुळे तिनही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत.
महायुतीच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत भोर-राजगड(वेल्हे)- मुळशीतील कामाच्या जोरावर पक्ष श्रेष्ठी आपल्यालाच पक्षाचा अधिकृत अर्ज देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. परंतु रात्री उशिरा महायुतीने शंकर मांडेकर यांना आयात करत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे किरण दगडे पाटील यांचा उमेदवारी मिळण्याचा विश्वास अयशस्वी ठरला.
यांनतर आज मंगळवारी शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी भोर शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या तीनही पक्षश्रेष्ठींनी विधानसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळेल या अटीवर पक्षप्रवेश करून घेतला होता. तसेच भोर विधानसभेची जागा शिवसेनेला(शिंदे गट) मिळणार असून तुम्हालाच अधिकृत उमेदवारी अर्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तसे न होता कोणालाच विचारात न घेता पक्षश्रेष्ठींनी उमेदवार जाहीर केला. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची स्मृति कमी झालेली आहे की काय? त्यांनी दिलेले शब्द पाळले गेले नाहीत. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सांगितले.
यांनतर काही वेळेतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिवतरे यांनी देखील बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. एकंदरीतच महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला उमेदवार तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांना रुचला नसून आगामी काळात हे तिनही उमेदवार काय करणार? याकडे मात्र भोर-राजगड-मुळशीतील जनतेचे लक्ष लागले आहे.