इसिसच्या(ISIS) दहशतवादी संशयितांना अटक केल्याबद्दल एनआयए(NIA) ने पुणे शहराच्या ५ पोलिसांचा १० लाखांचे रोख बक्षीस व प्रमाणपत्रे देऊन केला सत्कार
पुणे : आयएसआयएस दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित संशयितांना अटक केल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी पुणे शहर पोलिसांच्या पाच पोलिसांचा सत्कार केला. एनआयए(NIA) मुंबईचे आयपीएस अधिकारी प्रवीण इंगवले यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात येऊन अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे आणि ज्ञानेश्वर पांचाळ कोथरूड पोलिस यांना १० लाखांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे देऊन सत्कार केला.
रात्री २:३० वाजता गस्त घालत असताना चव्हाण आणि नजन यांनी मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफी उर्फ अब्दुल्ला, झारखंड येथील मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी यांना अटक केली. त्यानंतर कोंढवा येथील त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. संशयितांची घराची झडती घेतली जात असताना आलम पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. मार्च २०२२ मध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याच्या प्रकरणात खान आणि साकी दोघेही एनआयएला “मोस्ट वॉन्टेड” असल्याचे तपासात समोर आले आहे. ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असल्याचे सांगून आलम, खान आणि साकी कोंढवा येथे राहत होते.
एटीएसने पुणे पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतली आणि इसिसशी संबंध असल्याप्रकरणी आणखी काही संशयितांना अटक केली. ८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) तपास सोपवण्यात आला, त्यास पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरण असे नाव दिले. ऑक्टोबर २०२३ मध्ये आलमला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. एनआयएने पुढील तपासादरम्यान शमिल नाचन आणि त्याचे वडील साकिब नाचन या प्रमुख आरोपींना ठाणे ग्रामीणमधील पडघा येथून इसिस (ISIS) शी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केली. पुणे आणि इतर ठिकाणी त्यांच्याकडून स्फोटक साहित्य, तंबू, ड्रोन आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.