पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात विधवा प्रथेला अशी दिली मूठमाती; गावातील सर्व विधवा महिलांचा सहभाग, कृतीतून सुरुवात
आंबेगाव (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात कानसे येथे विधवा प्रथेला प्रत्यक्ष कृतीतून मूठमाती देण्याबाबतचा निर्णय आज मकरसंक्रांतिच्या निमित्ताने घेण्यात आला. गावातील विधवा महिलांचा पुढील काळात सन्मान व्हावा व त्यांना समाजाकडून मिळणारी दुय्यम स्वरूपाची वागणूक बंद व्हावी या दृष्टीने विधवा सन्मान कायदा अंमलबजावणीसाठी ठराव करण्यात आला होता. यावेळी विधवा सन्मान व संरक्षण संदर्भात सर्व महिलांना शपथ सुद्धा देण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी अश्या प्रकारे ठराव केले आहेत. परंतु ते फक्त कागदावरच न राहता यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या पुढाकारातून त्याची आज प्रत्यक्ष अंमलबाजवणी कानसे येथे बचत गट हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात झाली.
मकर संक्रांत या सणाच्या निमित्ताने कानसे येथे गावातील सर्व महिलांनी हळदी-कुंकु कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु पूर्व परंपरेनुसार हे सर्व फक्त सुवासिनी महिलांना करता येते. मात्र विधवा महिलांना हे सर्व करण्यास समाजाने घालून दिलेली बंधने अडसर ठरत आहेत. त्यांच्या वाट्याला विधवा म्हणून जगणे नशिबी आले त्यात त्याची काय चूक? म्हणून समाजाने त्यांना वेगळे न समजता इतर महिलांप्रमाणे सन्मान द्यायला हवा यासाठी त्यांच्या हातून हळदी-कुंकू व सुवासिन महिला साजरा करत असलेला सुगड पूजन व वाण देवघेवचा कार्यक्रम गावातील सर्व विधवा महिलांच्या हस्ते यशवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी यशवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष योगिता बोऱ्हाडे, सचिव अलका घोडेकर, आशा बोऱ्हाडे, अर्चना डोंगरे, लता वासाळे,लेखापाल कल्पना एरंडे, कार्यकर्ते सुहास वाघ, सीमा कानडे, हरिभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे, शुभांगी भोसले, वंदना बोऱ्हाडे, रेश्मा वाघ, इत्यादी बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा बोऱ्हाडे यांनी तर आभार अनिता आनंदराव यांनी मानले.