वाघजाईदेवी यात्रेनिमित्त उद्या भोरमध्ये निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा
भोर : भोर शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या वाघजाईदेवी यात्रा महोत्सव निमित्त भव्य निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा शनिवारी(दि.२४ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता वाघजाई मंदिराशेजारी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त प्रथम क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपये व मानाची गदा ठेवण्यात आली आहे. ही लढत पै. हर्षवर्धन सद्गिर(महाराष्ट्र केसरी काका पवार तालीम) विरुध्द पै. हर्षद कोकाटे(हनुमान आखाडा तालीम) यांच्यामध्ये होणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी २ लाख रुपये इनाम असून ही कुस्ती पै. पृथ्वीराज मोहोळ विरुध्द पै. संग्राम पाटील यांमध्ये होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये इनाम असून ही लढत पै. अक्षय गरुड विरुद्ध पै. संग्राम साळुंके यांमध्ये होणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी १ लाख रुपये इनाम असून ही कुस्ती पै. समीर शेख विरुद्ध पै. मनीष रायते यांमध्ये होणार आहे. पाचव्या क्रमांकासाठी ७५ हजार रुपये इनाम असून ही लढत पै. अंगद बुलबुले विरुद्ध गौरव हजारे यांमध्ये होणार आहे.
हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी भोरमधील अनेक माजी पैलवान तसेच युवक, ग्रामस्थ, कुस्तीशौकीन सर्वजण कामाला लागले असून आखाडय़ाची पाहणी, आखाडय़ाची दुरुस्ती आणि भव्य असा आखाडा तयार करण्यामध्ये सर्व कार्यकर्ते गुंतले आहेत. वाघजाई मंदिर परिसरात हा कुस्ती आखाडा आयोजित केला आहे. याबरोबरच जवळपास एकूण ५१ कुस्त्या या आखाडय़ात होणार आहेत. तसेच मुलींच्या कुस्त्याही या आखाड्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. या कुस्ती मैदान उद्घाटन समारंभाला सर्व स्तरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.