सातारा जिल्हा परिषदेचा वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषद येथील भविष्य निर्वाह निधी पथकाचा वरिष्ठ सहाय्यक हेमंत विठोबा हांगे (वय ३५) याने ३ हजार रुपयांची लाच स्वीकारतानाच त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले.
बुधवारी सायंकाळी उशिरा केलेल्या या कारवाईत रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या तक्रारदाराने सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात भविष्य निर्वाह निधी पथकाचे वरिष्ठ सहाय्यक हेमंत हांगे हा भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्याकरीता ज्युनिअर
कॉलेजच्या पर्यवेक्षकास पैसे मागत होता.तक्रारदाराने तीन हजार रुपये देतो माझे काम कर अशी विनंती करताच त्याने काम करण्याची तयारी दर्शवली. त्याचवेळी याबाबतची तक्रार त्या पर्यवेक्षकाने सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता या विभागाने सापळा रचुन बुधवरी १७ जानेवारी रोजी सायंकाळी उशिरा हांगे यास ताब्यात घेतले. त्यानंतर याबाबतची तक्रार एसीबीने सातारा शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दिली आहे. पोलिसांनी रात्री उशीरा हांगे यास अटक केली. हांगे याच्या अटकेने सातारा जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.