भोर तालुक्यातील मांस व मद्य विक्री २२ जानेवारी रोजी बंद ठेवा; भोर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांची तहसीलदारांकडे मागणी
भोर : आयोध्या येथे निर्माणाधीन राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी भोर तालुक्यातील मांस व मद्य विक्री बंद ठेवावी, अशी मागणी भोर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.
२२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असून तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने सबंध देशामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्री राम हे हिंदू धर्माचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार असून भोर तालुक्यात देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने सर्व समाज बांधवांमध्ये शांतता, एकोपा व सामाजिक संदेश जावा यासाठी आपण भोर तालुक्यातील सर्व मांस विक्री केंद्र बंद ठेऊन समस्त हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करावा अशी मागणी आज भोर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा वकील सेलचे उपाध्यक्ष कपिल दुसंगे, उद्योजक अतुल काकडे, सरचिटणीस समीर बांदल, सुशांत लोखंडे, सौरभ राऊत, अविनाश शिंदे, राहुल गुजर व भोर तालुक्यातील श्रीराम भक्त उपस्थित होते.