मैत्रिणींना वाचवायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू; परिसरात शोककळा
वेल्हा : पुण्याच्या खडकवासला धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणाजवळ खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८वर्षे, रा. खराडी, पुणे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात खराडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर बालाजी मनाळे हा तरुण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी पाणशेत धरण परिसरात आला होता. यावेळी सेल्फी काढताना त्याच्या दोन मैत्रिणी पाण्यात पडल्या. मैत्रिणी पाण्यात पडल्याचे पाहून ज्ञानेश्वर मनाळे हा तरुण त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला, यामध्ये त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवानांनी त्याचा शोध घेतला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत वेल्हा पोलिस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत.