वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : पीएचडी डीग्रीसाठी प्रबंध सादर करणे आणि त्याला अप्रुव्हल देण्यासाठी पंचवीस हजारांच्या लाचेची करण्यात आली होती. त्यामधील वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पीएचडी मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापिकेला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे विभागाने शनिवारी(दि. ३० मार्च) रोजी सांगवी येथे ही कारवाई केली. डाॅ. शकुंतला निवृत्ती माने (वय ५९) असे ताब्यात घेण्यात आलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे ४० वर्षीय पुरुष असून ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. त्यांनी अर्थंशास्त्रामध्ये Ph. D. डिग्री प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाईन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करिता तयार केलेला आहे. हा प्रबंध विद्यापीठाकडे सादर करण्यासाठी तक्रारदार यांचे मार्गदर्शक म्हणून लोकसेविका शकुंतला माने यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदार यांनी सादर केलेला प्रबंध रिजेक्ट करण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे व त्यावर परवानगी देणे यासाठी लोकसेविका शकुंतला माने यांनी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दिली होती.
सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेविका शकुंतला माने यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष वरील कामकाजासाठी पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार शनिवारी(दि. ३० मार्च) रोजी लोकसेविका शकुंतला माने यांनी तक्रारदार यांच्याकडून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. लोकसेविका शकुंतला माने यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, सहाय्यक फौजदार मुकुंद अयाचित, पोलिस अंमलदार चेतन कुंभार, महिला पोलिस अंमलदार पूनम पवार, चालक पोलिस अंमलदार माळी या सर्वांनी अमोल तांबे पोलिस अधीक्षक, डॉ. शीतल जानवे वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा शनिवारी(दि. ३० मार्च) बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुखाचे कार्यालय, सांगवी, पुणे येथे रचून शकुंतला माने यांना लाच घेत असताना पकडले. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या या तत्पर कारवाईमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.