पुण्यात डासांचं वादळ खरे की खोटे? पडताळणी मध्ये सत्य आले समोर, पर्यावरण शास्त्रज्ञांनी दिली माहिती
पुणे : पुण्यात डासांचं वादळ म्हणून एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आतापर्यंत डासांना जमिनीवर, फार फार तर माणसांच्या डोक्यापर्यंतच्या उंचीइतकं उडताना पाहिलं आहे. आजवर आकाशात इतक्या उंचावर डास कधीच उडताना दिसले नाही, तेसुद्धा इतक्या संख्येने. त्यामुळे पुण्यातील डासांचं वादळ म्हणून व्हायरल होणारा व्हिडीओ खरंच पुण्यातील आहे का? त्या व्हिडीओत दिसले ते खरंच डास आहेत का?
डासांच्या वादळाचं हे भयानक दृश्य केशवनगर मुंढवा खराडी परिसरातील नदीपात्रातील असल्याचं सांगितलं जातं आहे. मुळा-मुठा नदीच्या वर असे डास दिसले. आजवर असं दृश्य कुणी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे दृश्य पाहून सर्वांनाच भीती वाटली आहे. पण या व्हायरल व्हिडीओचं फॅक्ट चेक केल्यावर वेगळंच सत्य समोर आलं आहे.
ज्या परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे, तिथले नागरिक आणि पर्यावरण शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली असता, हा व्हिडीओ खरा आहे. पण ज्यांना डास म्हटलं जात आहेत, ते डास नाहीत, पुण्यातील व्हायरल व्हिडीओत दिसणारे ते हे डास नाहीत. पण डासांसारखा दिसणारा एक कीटक आहे. याला घोस्ट स्नॅक्स किंवा नॉन बायटिंग मिजेस असं म्हटलं जातं. हा चावणारा कीटक नाही. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार झाली आहे. या परकीय वनस्पतीनं आपल्या नदीपरिसंस्थेवर आक्रमण केलं आहे. ही जलपर्णी नदीचा प्रवाह थांबवते, प्रवाह थांबल्याने पाणी साचते. असे ठिकाण अशा किटकांना अंडी घालण्यासाठी अनुकूल असतं. त्याच्या अळ्या तयार होतात त्या पाण्यात राहतात. नंतर त्यांची कोशावस्था आणि मग उन्हाळ्याच्या कालावधीत त्या प्रौढ होऊन मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यानंतर मीलन किंवा प्रजनन काळात नर पाण्याच्या पृष्ठभागापासून उंच आकाशात झेपावतात. मादीला आकर्षित करण्यासाठी नरांमध्ये अशी लढाई असते. त्या चढाओढीत असे ढग तयार होतात. मोठी संख्या असल्याने ते वादळासारखं दिसतं, असे पर्यावरण शास्त्रज्ञ म्हणाले.