भोर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
भोर : भोर शहरातील नवीआळी येथील अवैध्य जुगार अड्ड्यावर भोर पोलिसांनी छापा टाकत तीन जणांवर कारवाई केली आहे. अविनाश प्रकाश पवार(वय २९ वर्ष, रा. चौपाटी, भोर), गणपत मोहन पवार(वय २७ वर्ष, रा. अनंत नगर, भोर) निलेश भोलेनाथ दिले(वय ४२ वर्ष रा. नागोबाळी, भोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सादिक मुबारक मुलानी यांनी फिर्याद दिली आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णा पवार यांना मंगळवारी(दि. ३० एप्रिल) गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, भोर शहरातील नवीआळी येथील मुस्लिम कब्रिस्तान शेजारील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही जणांच्या उपस्थितीत बेकायदेशीररित्या विनापरवाना पत्त्याच्या डावावर पैसे स्वीकारून तीन पाणी पत्त्यांचा डाव सुरू आहे. पोलीस निरीक्षक पवार यांनी लगेचच घटनास्थळी भोर पोलिसांचे एक पथक रवाना करून छापा टाकला असता अविनाश पवार, गणपत पवार, निलेश दिले हे सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या तीन पाणी पत्ते खेळत असताना आढळून आले. भोर पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार खांडे करीत आहेत.