महाबळेश्वरमध्ये पारा घसरला, पर्यटक लुटतायत थंडीचा आनंद
महाबळेश्वर : जागतिक पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा गेल्या काही दिवसांपासून १३ अंशादरम्यान आहे. यामुळे गारठा कायम आहे. तरीही या वातावरणाचा आनंद पर्यटक लुटत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते. पण, यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी जाणवलीच नाही. मात्र, डिसेंबरच्या मध्यावर थंडीची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे प्रथमच पारा १५ अंशाच्या खाली आला. सातारा शहराचे किमान तापमानही १३.२ अंशपर्यंत उतरले होते. हे तापमान या वर्षातील नीच्चांकी ठरले. यामुळे थंडीत वाढ झाली. पण, दोन दिवसानंतर साताऱ्याचा पारा पुन्हा १८ अंशावर पोहोचला. यामुळे थंडी कमी झाली. तरीही ढगाळ हवामान तयार होत असल्याने आणि हवेतही थंड लहर आहे. या कारणाने बोचरी थंडी जाणवत आहे.
तर महाबळेश्वरचा पारा अजून १५ अंशाच्या खालीच आहे. बुधवारी १२.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वरचा पारा सतत १३ अंशादरम्यान राहत असल्याने गारठा कायम जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनाही ऊबदार कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. तर या थंडीचा आनंद पर्यटक घेत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत.