मराठ्यांचे आग्या मोहळ लोणावळ्यात दाखल, मराठ्यांची तूफान गर्दी; काही तासांतच मुंबईच्या वेशीवर धडकणार
लोणावळा : मनोज जरांगे पाटील यांचा चौथा मुक्काम व सभा लोणावळा शहराच्या जवळ असलेल्या वाकसई चाळ येथे बुधवारी रात्री ८:३० वाजता होणार होता. मात्र वाघोली ते लोणावळा असा प्रवास करताना मनोज जरांगे पाटील यांना तब्बल १० तासाहून अधिक वेळ लागल्याने त्यांना मुक्काम व सभा स्थळी पोहचण्यासाठी सकाळचे ६:४५ वाजले.सकाळी ६ वाजता जरांगे पाटील मावळच्या भूमीत दाखल झाले असून त्यांची सभा होणार थोड्याच वेळात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र सकल मराठा समाज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी रात्रभर सभास्थळी शेकोट्या पेटवून बसला होता. याविषयी पहाटे चार वाजता त्यांच्याशी संवाद साधला असता आमच्या मुला बाळांना आरक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आमचा मनोज दादा रात्रंदिवस जागा असताना आम्हाला झोप कशी येणार अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वाघोली येथून काल सकाळी निघालेले मनोज जरांगे पाटील आजून जागे आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी थांबले आहेत.
त्यांच्या प्रेमामुळे मनोज जरांगे पाटील यांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी उशिर झाला. मात्र पुण्यापासून लोणावळ्यापर्यंत समाज त्यांच्या स्वागतासाठी तेवढ्याच जोशात थांबला होता. रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक मराठा समाज बांधवांचे जल्लोषात स्वागत केले जात होते. सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येक बांधवाची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची, चहाची व्यवस्था केली जात होती. परिसरात अस्वच्छता होऊ नये याकरिता स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली होती. थंडी जास्त असल्याने ब्लॅंकेट देखील वाटप करण्यात आले. सभास्थळी पोवाडा सादर करण्यात आला. त्यामधून समाज जागृती करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मावळात खास बैलगाडी सजवण्यात आली होती. रात्रभर सकल मराठा समाजातील स्वयंसेवक नेमून दिलेल्या ठिकाणी कामे करत होते. लांबचा प्रवास करून आलेले समाज बांधव मैदानात झोपले होते. मुला बाळांना आरक्षणाचा लाभ मिळावा, भविष्यात त्यांची आबाळ होऊ नये म्हणून अनेक ज्येष्ठ मंडळी देखील जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यात मुंबई च्या दिशेने निघाली आहेत. सकाळी ६ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याची गाडी सभास्थळी दाखल झाली असून त्यांची सभा होणार थोड्याच वेळात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.