जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी १० हजारांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला अटक
दौंड : तक्रारदार यांच्या बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना अटक केली आहे. आज बुधवारी ही कारवाई करण्यात आली. माधव राजाराम रेषेवाड (वय ५४ वर्षे, पद-महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय, दौंड,वर्ग ३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या बँकेच्या थकीत कर्ज प्रकरणी घर जप्ती आदेशाची मुदत वाढवून देण्यासाठी दौंड तहसील येथील लोकसेवक रेषेवाड यांनी तक्रारदार यांना १० हजार रुपयांची लाच मागीतली होती. ही मागणी ९ जानेवारी रोजी केल्या नंतर फिर्यादी यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता रेषेवाड याने घर जप्तीची मुदत वाढवुन देतो म्हणून १० हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देतांना महसुल विभागातील एक अधिकारी म्हणाले, बॅंकेकडून घेतलेल्या मूळ कर्जाची रक्कम, त्यावरील थकीत व्याज, चक्रवाढ व्याज, हाताळणी खर्च, प्रवास खर्च, नोटीस खर्च अशा विविध ज्ञात-अज्ञात हेडच्या आर्थिक बोजाखाली कर्जदार अगोदरच अडकलेला असतो. त्याची बाजारातील आर्थिक पत व जनमानसातील इज्जत जाईन या भितीने मालमत्तेची जप्ती टाळण्यासाठी धावाधाव करीत असतो. अशा आर्थिक पत व इज्जतीच्या चक्रव्युवहात अडकलेल्या कर्जदाराला कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या जप्तीच्या नोटीशीची भिती दाखवून, त्याच्याकडुन पैसे घेणे ही बाब लाजीरवाणी आहे. संबधित अधिकाऱ्यास, एखाद्याला मदत करण्यासाठी फोन करण्याचा प्रयत्न केल्यास जप्ती टाळण्यासाठीची रक्कम वाढते असा अनुभव अनेकांना आलेला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होण्याची गरज आहे.