भोर येथे २८ एप्रिलला अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
भोर : अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवारी(दि. २८ एप्रिल) करण्यात आले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यास २००६ पासून सुरुवात झाली असून या विवाहसोहळ्यासाठी आत्तापर्यंत २५ जोडप्यांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी रविवारी(दि. २१ एप्रिल) पर्यंत करता येणार आहे. तरी इच्छुक जोडप्यांनी रविवारपर्यंत लग्नासाठी नोंदणी करावी असे आवाहन भोर येथील राजगड ज्ञानपीठाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा स्वरूपा थोपटे यांनी केले आहे. यावेळी गीतांजली आंबवले, श्रीधर निगडे, पंढरीनाथ उल्हाळकर व कर्मचारी उपस्थित होते.
भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या मैदानावर श्री क्षेत्र नारायणपूरचे नारायणमहाराज यांच्या उपस्थितीत रविवारी २८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी हा सोहळा रंगणार आहे. या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा व खर्च वाचवावा, असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या विवाह सोहळ्यातील वधुवरांना लग्नाचा पोशाख, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी भांडी, बूट, चप्पल तसेच सर्वांची भोजनाची व्यवस्था अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर, राजगड, मुळशी यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच लग्नाच्या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात येणार असून लकी ड्रॉ मध्ये वधू-वरांना दुचाकी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, पीठ गिरणी, फूड प्रोसेसर, मायक्रो ओव्हन, टेबल फॅन, डिनर सेट, वॉटर फिल्टर व मिक्सर आदी बक्षिसे मिळणार आहेत. या विवाह सोहळ्यात सर्वधर्मियांचा सहभाग असणार आहे.
या विवाह सोहळ्यासाठी ७२५ स्वयंसेवक काम करणार असून राजगड सहकारी साखर कारखाना, रायरेश्वर डोंगरी विकास परिषद, दत्त दिगंबर वाहतूक संस्था आणि राजगड ज्ञानपीठ यांचे सहकार्य मिळणार असल्याचे स्वरूपा थोपटे यांनी सांगितले. तसेच विवाह नोंदणी करण्यासाठी मुलगा व मुलगी या दोघांचे दाखले घेऊन ९८५०८८०८३८, ९८२२७७०६६० आणि ९०११५३३१४२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच भोर, राजगड, मुळशीतील गरजू, गरीब, मुला-मुलींच्या पालकांनी स्वतः नावनोंदणी करावी, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.