हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे चोरी करणारा आरोपी रंगेहाथ ताब्यात; शिंदेवाडी(भोर) येथील घटना

खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या शिंदेवाडी(ता.भोर) येथील हॉटेल सुमित चे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस हॉटेल मालक यांनी सतर्कता दाखवून रंगेहाथ पकडले. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. रूतीक लिंबाजी बनसोडे(वय १९ वर्ष, सध्या रा. गोकुळनगर, कात्रज. मुळ रा. सावरगाव ता. तुळजापुर) हा रंगेहाथ पकडलेला संशयित आरोपी असून योगेश चौगुले(रा.खोपडेनगर, कात्रज) हा पळून गेला असल्याची फिर्याद हॉटेल मालक मंगेश श्रीपती शिंदे(वय ३४ वर्ष, रा.शिंदेवाडी, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Advertisement

राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल सुमित चे मालक तसेच फिर्यादी मंगेश शिंदे हे हॉटेल च्या बाजूलाच रहावयास आहेत. आज बुधवारी(दि. ६ मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांना हॉटेल चे कुलूप कोणीतरी अज्ञात व्यक्ती तोडत असल्याचा जोरात आवाज आला. त्यांनी व कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले असता रूतीक बनसोडे हा हॉटेल चे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता, तर योगेश चौगुले हा बाजूला रोडवर मोटार सायकल(एम एच १२ एच एक्स ४२१४) वर बसून कोणी ये-जा करीत आहे का याबद्दल माहिती देत होता. शिंदे कुटुंबीयांनी सतर्कता दाखवत बाहेर येऊन रूतीक ला रंगेहाथ पकडुन राजगड पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु अंधाराचा फायदा घेत योगेश पळून जाण्यात यशस्वी झाला. हॉटेल मालक मंगेश शिंदे यांच्या सतर्कतेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. मागील काही दिवसांपासून खेड शिवापूर हद्दीत चोरीच्या प्रमाणात खूप वाढ झाली होती. या चोरीच्या घटनेशी या आरोपींचा संबंध आहे का? याबाबतचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page