जेव्हा सोनिया गांधींनी अनंतराव थोपटेंसाठी महाराष्ट्रातील पहिली सभा भोर मध्ये घेतली होती……वाचा सविस्तर
भोर : ५ ऑगस्ट १९९९, दुपारचे साधारण दोन वाजले असतील. भोर येथे काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी लाखोंची गर्दी जमा झाली होती. पाऊसाची रिपरिप सुरु होती. ग्रामीण भागातल्या आयाबाया डोक्यावर प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन सभा सुरु होण्याची वाट बघत होत्या.
कधी नव्हे ते अत्याधुनिक कार, मोटरगाड्या खेडेगावातल्या रस्त्यातून भोर कडे येत होत्या. कित्येक काँग्रेसचे नेते या ट्राफिक मध्ये अडकले होते. शेवटी सुरेश कलमाडी आणि इतर पुढारी आपल्या गाड्या चिखल तुडवत सभेच्या ठिकाणी चालत निघाले. साधारण सव्वा दोनच्या दरम्यान आसमंतात हेलिकॉप्टर घोंगावू लागलं आणि नारा झाला, “सोनिया गांधी जिंदाबाद”. तब्बल दोन तास सभेला उशीर झाला होता. सोनिया गांधी यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि माधवराव सिंधिया हे होते. प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी त्यांचं स्वागत केलं.
हिरवी नऊवारी साडीचोळी परिधान करून आलेल्या सोनिया गांधींनी आपल्या भाषणाची सुरवात अस्सल मराठीत केली. सुरवातीची काही वाक्ये मराठीत झाल्यावर त्यांनी पुन्हा हिंदीचा सहारा घेतला. आपल्या भाषणात त्या सांगत होत्या, “छत्रपती शिवाजी महाराज की जितनी भी तारीफ कि जाए उतनी कम है मगर आजकल कुछ लोग उनका नाम ले कर देश में फूट डलवाना चाहते है.” सोनिया गांधींची महाराष्ट्रातील ही पहिलीच प्रचारसभा भोर सारख्या आडमार्गावरील भागात घेण्यामागं एक विशेष कारण होतं, त्यांची नऊवारी साडी, मराठीत घोषणा या सगळ्यामागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी होती. ते कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना. खरं तर सीताराम केसरी यांना हटवून सोनिया गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आणणाऱ्यामध्ये शरद पवारच आघाडीवर होते पण जेव्हा सोनियांनी पक्षावर आपली पकड घट्ट केली तेव्हा पवारांनी विदेशी जन्माचा मुद्दा पुढे केला आणि पक्षात बंड केले. यातूनच शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी फुटून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
तस बघायला गेलं तर हा नवा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता मात्र त्याच्या खऱ्या ताकदीची चाचणी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या महाराष्ट्रात होणार होती. आणि ती परीक्षा होती १९९९ सालच्या विधानसभा निवडणूका. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमनेसामने येणार होते. शिवाय सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप युतीचा तिसरा कोन देखील होताच. या निवडणूक आजवर झाल्या नाहीत इतक्या चुरशीच्या होणार होत्या.
शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे, भाजपचे गोपीनाथ मुंडे महाजन यांनी प्रचारात आघाडी घेतली होती मात्र त्यांच्या सरकारच्या कारभारावर जनता खुश नव्हती. काँग्रेसला यंदा मोठी संधी मानली जात होती पण राष्ट्रवादी फुटल्यामुळं त्यांची मते आणि नेते विभागले जाणार होते. काँग्रेसला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आपले नेते पवारांच्या कळपात जाऊ द्यायचे नव्हते. दोन्ही पक्षांची याबद्दल चढाओढ सुरु होती. शरद पवारांचा सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे हा साखर पट्टा बालेकिल्ला मानला जायचा. त्यांनी तिथले अनेक नेते गळाला लावले होते. काँग्रेसला हे थांबण्यासाठी काही तरी पाऊल उचलावं लागणार होतं. यातूनच काँग्रेस हायकमांडने सोनिया गांधींना महाराष्ट्रात प्रचारात उतरवायचं ठरवलं आणि मतदारसंघ निवडला थोपटेंचा भोर. भोर हा शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा तालुका. अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे जुने व दिग्गज नेते. त्यांना पवारांचे मोठे विरोधक मानले जायचे. १९९२ साली पवारांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं तेव्हा पासून हा वाद चालत आलेला. पवारांना हरवायच असेल तर त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन त्यांचे विरोधक असणाऱ्या थोपटेंना बळ द्यावं लागेल, असं सोनिया गांधींना त्यांचे राजकीय सल्लागार व माजी सनदी अधिकारी असणाऱ्या राम प्रधान यांनी सांगितलं.
राम प्रधान यांनीच पवारांचे जुने विरोधक मानल्या जाणाऱ्या इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्या सारख्या सहकारातल्या नेत्यांना काँग्रेस मध्ये आणलं आणि भोर मध्ये पहिली सभा आयोजित केली. त्याकाळी सोनिया गांधी अजून राजकारणात नवख्या होत्या. त्यांना हिंदी बोलता येत नाही, त्या भाषण वाचून दाखवतात अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. पण असंख्य अडचणीवर मात करून सोनिया गांधींनी निवडणुकीच्या प्रचारात आपलं दमदार पाऊल टाकलं होतं. इंदिरा गांधींची सून दिसते कशी, बोलते कशी याची ग्रामीण भागात प्रचंड उत्सुकता होती. त्यांना पाहायलाच लाखोंची गर्दी झाली.
त्या सभेत मराठी मध्ये भाषणाची सुरवात आणि नऊवारी साडीची आयडिया राम प्रधानांचीच होती. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगड, तोरणा, पुरंदर या भागातील मोठी जनसंख्या या सभेला उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय या ललकारीने सोनिया गांधीने सगळ्या सभेचं मन जिंकून घेतलं. या सभेत बोलताना त्या म्हणाल्या, “काही जणांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी काँग्रेसशी बेईमानी केली आहे. यापूर्वी इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळात देखील त्यांनी हेच केलं होतं आणि आताही ते हेच करत आहेत.” त्यांचा रोख शरद पवार व त्यांच्या समर्थक नेत्यांवर होता. पुढे आपल्या भाषणात त्यांनी सेने भाजप सरकारवर देखील जोरदार टीका केली. गुजरात व मुंबई मध्ये अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले, कारगिल युद्धात वाजपेयी सरकार कडून झालेली अक्षम्य चूक याबद्दल त्या बोलल्या. पण या प्रचारात सरळ दिसत होत कि खरी लढाई काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असणार होती.
अनंतराव थोपटे यांचं दिल्ली दरबारातील महत्व या निमित्ताने प्रचंड वाढलं. काँग्रेस जर सत्तेत आली तर मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे जाणार अशी चर्चा सुरु देखील झाली होती. राष्ट्रवादीशी थेट नडणाऱ्या नेत्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे आलं होतं. पण शरद पवारांनी थोपटे यांना पाडण्यासाठी आपली ताकद पणाला लावली. डाविक राजकारण केले. दिल्ली दरबारी थोपटेंचे वाढलेले वजन न पाहवणाऱ्या काँग्रेस नेत्यांनीही थोपटेंच्या विरोधात काम करून पवारांना मदत केली, असे बोलले जाते. १९९९ च्या त्या निडवडणुकीत सोनिया गांधींची विक्रमी सभा होऊनही अनंतराव थोपटे यांचा पराभव झाला. अनंतरावांच्या उभरत्या कारकिर्दीला शरद पवारांनी धक्का दिला होता. पुढे त्यांच्या दुर्दैवाने सत्तेची गणिते बदलत गेली. शिवसेना भाजप युतीचा पराभव झालाच पण त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले. निवडणुकीत हरलेल्या थोपटेंच्या जागी विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. आपल्या नेतृत्वाला पुणे जिल्ह्यातून आव्हानच उभे राहाता कामा नये, हा पवारांचा मनसूबा तेवढ्यापुरता यशस्वी झाला. पण अनंतरावांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ते संपवू शकले नाहीत.