शिवापूर वाडा येथील सराफ व्यावसायिकास लुटणाऱ्या सराईत टोळीतील फरार आरोपीस राजगड पोलिसांनी केले जेरबंद
खेड शिवापूर : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवापूर वाडा येथील आकांक्षा ज्वेलर्स मधील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील फरार आरोपीस राजगड पोलिसांनी जेरबंद केले आहे. निलेश पांडुरंग डिंबळे(वय ३० वर्ष, रा. कल्याण, ता.हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवापूर वाडा येथील आकांक्षा ज्वेलर्स चे मालक यशवंत राजाराम महामुनी (रा. शिवापूर ता. हवेली जि. पुणे) यांच्याकडील एकूण ६,५८,००० रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत त्यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली होती. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी कसून तपास करून सदर गुन्ह्यातील ७ आरोपी पैकी शोध घेऊन रोहित ऊर्फ बाबा प्रकाश साठे, निखिल भगवंत कांबळे, निलेश दशरथ झांजे, शफीक मकसूद हावरी, साहिल हनीफ पटेल यांना यापूर्वी सदर गुन्ह्यात अटक केले होते.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश डिंबळे हा कित्येक दिवस राजगड पोलिसांच्या ‘हातावर तुरी’ देत होता. राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हा एका कार्यक्रमानिमित्त पुणे येथून त्याच्या कल्याण(ता.हवेली) गावी निघालेला आहे. त्यांनी लगेचच ही माहिती पोलिस उपनिरिक्षक दाजी देठे यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार अजित माने आणि राहुल कोल्हे यांच्या समवेत जाऊन रांजे (ता.भोर) येथील चितळे कंपनी जवळून निलेश डिंबळे यांस आज शनिवारी(दि. १७ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता ताब्यात घेतले. न्यायालयाने सदर आरोपीस २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास राजगड पोलीस करीत आहेत.