सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील पाच वर्षांतील कार्यअहवाल प्रसिद्ध
पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त साधत खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या कार्याचा ‘सेवा सन्मान स्वाभिमान’ हा कार्यअहवाल खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. शिवजयंती निमित्त शिवाजीनगर येथील एस एस पी एम एस संस्थेच्या आवारातील शिवस्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
शिवजयंतीच्या निमित्ताने खासदार सुळे यांनी कार्यअहवाल यावेळी शिवचरणी अर्पण करत आपल्या मतदार संघातील कार्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब या अहवालातून मांडत आहे. या पाच वर्षांच्या काळात खासदार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचा आवाज सभागृहात बुलंद करण्याचे काम केले. मतदारसंघ आणि राज्याच्या व्यापक हिताचे, महिला, बेरोजगार तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय आदी सर्व घटकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा प्रांजळ प्रयत्न केला. बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादाने जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे भाग्य मला लाभले ही माझ्यासाठी खुप मोलाची गोष्ट आहे’.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून आपण जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी व महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, ही त्रिसुत्री सदैव डोळ्यांसमोर ठेवून काम करत असून याचे प्रतिबिंब या अहवालात आपणास पहायला मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘आपण सर्वांनी मला आपला आवाज म्हणून लोकसभेत निवडून पाठविले. माझ्यावर ठेवलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव काम केले आहे. आपण मला जे प्रेम, आदर आणि माया दिली याबद्दल मी आपली शतशः ऋणी आहे’.
सुप्रिया सुळे यांच्या कार्याचा हा अहवाल लवकरच डिजिटल स्वरुपात त्यांची वेबसाईट आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून नागरिकांनी प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, असे आवाहनही सुळे यांनी यावेळी केले आहे.