बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक चिन्हामुळे खळबळ; सुप्रिया सुळे यांचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह तर दुसऱ्या एका उमेदवाराला देण्यात आले ‘तुतारी’ हे चिन्ह
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा निवडणूक चिन्हामुळे चर्चेत आला आहे. यंदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, २२ एप्रिल रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर, दुसऱ्या एका उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून आता शरद पवार गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
लोकसभा निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बारामती मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण ५० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची २० एप्रिलला पडताळणी झाली. यामध्ये ४६ अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून ३८ उमेदवार रिंगणामध्ये आहेत. या ३८ उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंती क्रमामध्ये ‘तुतारी’ या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तुतारी हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली ही चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल.
-डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी