छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा सारोळ्याचे जावई असणाऱ्या थोपटेवाडीच्या सुपुत्राने घडवलाय……सविस्तर वाचा

मुख्य संपादक : दिपक महांगरे.
पुणे : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील क्रांती चौकात भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २३ फूट उंच आणि २१ फुट लांब असून चौथऱ्यापासून पुतळ्याची एकूण उंची ५२ फूट आहे. तर पुतळ्याचं वजन एकूण १० टन असून त्यात ६ टन ८०० किलो गनमेटलचा वापर करण्यात आला आहे. महाराजांचे हावभाव, भरजरी पोशाख, दागिने आणि एका हातात लगाम तर दुसऱ्या हातात तलवार अशा सगळ्याचं सुरेख एकत्रीकरण या एकाच पुतळ्यात बघायला मिळते, त्यामुळे हा पुतळा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.

मात्र ज्या व्यक्तीमुळे हे शक्य झाले आहे, ज्या व्यक्तीने या शिल्पाला जन्म दिलाय आणि अनेकांच्या स्वप्नाला, प्रतिक्षेला आकार दिलाय तो अवलिया व्यक्ती म्हणजे “दीपक दिनकर थोपटे”. भारताला “फायबर ग्लास” मध्ये पाहिले राष्ट्रीय पारितोषक मिळवून देणारे थोपटेवाडी(ता. पुरंदर) येथील सुप्रसिद्ध शिल्पकार दिनकर थोपटे यांचे ते सुपुत्र. तसेच सारोळे(ता.भोर) गावातील मानाचा तुरा असलेले मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक पैलवान ज्ञानोबा पवार यांची कन्या सुरेखा यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला आहे. दीपक थोपटे हे पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत.

Advertisement

वडिलांना लहानपणापासून शिल्प साकारताना बघून मुलालाही शिल्पकलेचं वेड लागलं. तेव्हा त्यांनी मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वडिल दिनकर थोपटे यांच्या स्टुडियोमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. दिनकर थोपटे यांनी पुण्यातील अनेक शिल्प साकारले आहेत. तेव्हापासून दीपक थोपटे यांनी अनेकांच्या कल्पनेला आकार दिला आहे. यापैकी अकलूज येथील भुईकोट किल्ल्यातील शिवसृष्टी, जुन्नर येथील राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबांचे शिल्प, श्रीशैलम येथील शिवसृष्टी, चिंचवडचे चाफेकर चौकातील चाफेकर बंधूंचे शिल्प, जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथा मंदिर, देहू येथील शिल्पकला, अक्वामॅजिका थीम पार्क अशी त्यांची काही प्रसिद्ध शिल्प आहेत.

दीपक थोपटे यांच्या प्रतिभेला अनेकांनी ओळखलं आहे. आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दीपक थोपटे यांना जहांगीर आर्ट गॅलरी २०१३, अंबाला कॅन्ट सर्टिफिकेट १९९०, महाकौशल कला प्रदर्शन रायपूर १९९२, आर्ट सोसायटी मुंबई, राष्ट्रीय कला मेळा, दिल्ली-१९९८, बॉम्बे आर्ट सोसायटी- १९९७-९८, राज्य कला स्पर्धा-२००० अशी अनेक पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आलेलं आहे.

दीपक थोपटेंच्या कामावर अनेकांचा असलेला विश्वास बघूनच छत्रपती संभाजी नगर येथील भव्य अश्वारूढ पुतळा घडवण्याचं काम त्यांना देण्यात आले होते. त्यांच्या पुण्यातील चित्रकल्पक स्टुडियोमध्येच हा पुतळा साकारला गेला आहे. दीपक थोपटे व संतोष पवार तसेच ३५ सहकाऱ्यांची १८ महिन्यांची मेहनत म्हणजे हा भव्य रूबाबदार पुतळा आहे. प्रथम मातीकाम करून नंतर धातुरूपात हा पुतळा तयार करण्यात आला. हा भारतातील आत्तापर्यंतचा महाराजांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा आहे, असा पुतळा त्यांनी याआधी कधीच घडवला नव्हता असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य पुतळ्याने एक वेगळंच सौंदर्य येथील क्रांती चौकाला लाभले आहे. यामध्ये दीपक थोपटेंचा मोलाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page