देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज कारवाई करणाऱ्या पुणे पोलिसांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर

पुणे : पुणे पोलिसांनी दिल्लीतून ९७० किलो एमडी ड्रग्ज जप्त केल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी त्यांचा सन्मान केला आहे. यासाठी पुणे पोलिसांचे अभिनंदन करताना त्यांनी २५ लाख रुपयांचा पुरस्कारही जाहीर केला.

तसेच भविष्यातही ड्रग्ज फ्री महाराष्ट्राची मोहिम सुरु ठेवण्याबाबत विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुणे पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. नजीकच्या काळातील ही देशातील सर्वात मोठी कारवाई आहे. जवळपास ३ हजार ६०० कोटी रुपयांचा एमडीचा साठा हस्तगत करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.”

Advertisement

“गेले काही महिने आपण सातत्याने ड्रग फ्री मोहिम मोठ्या प्रमाणात राबवत आहोत. अमली पदार्थ समाजाला आणि तरुणाईला उध्वस्त करण्याचे काम करत आहे. जे काम बंदुकीच्या गोळ्या किंवा मिसाईल करु शकत नाही ते काम अमली पदार्थ करु शकतात. त्यामुळे एकत्रितपणे याविरोधात लढाई लढली गेली पाहिजे. यासंदर्भात शून्य सहिष्णुतेची भुमिका असली पाहिजे, अशी सुचना मी दिली होती. पुण्यात झालेल्या कारवाईतून आपले सर्वांचे डोळे उघडायला हवे. हा साठा शेवटपर्यंत पोहोचला असता तर किती घरं उध्वस्त झाली असती याचा विचार आपण करायला हवा,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “अलिकडच्या काळात कारखाने टाकून एमडीसारखे अमली पदार्थ बनवण्याचे काम सुरु आहे. यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण असल्याने लालसेपोटी हे काम होताना दिसत आहे. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची आहे. आपल्यासमोर काय आव्हान आहे हे आपल्याला आज लक्षात घ्यावं लागेल. तसेच भविष्यातही एका नवीन ऊर्जेने ड्रग्जविरोधातील ही लढाई लढत राहू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page