सायली पाटील ठरल्या राज्यातील उत्कृष्ट कार्यकारी अभियंता
पुणे : जलसंपदा विभागात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटील यांना शासनाचा राज्यातील उत्कृष्ट कार्यकारी अभियंता पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगोला शहरातील मा. नगरसेविका पूजा राजेंद्र पाटील यांच्या सुकन्या श्रीमती सायली राजेंद्र पाटील या कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणून मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर येथे कार्यरत आहेत. त्यांनी केलेले काम सर्वोत्कृष्ट ठरले आहे.
जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून २०२१ मधील पुरस्कार जाहीर झाले नव्हते. मात्र, आता नियमावली अधिक सुटसुटीत करीत पुरस्कारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. जलसंपदातील अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीची उत्तम अंमलबजावणी करावी. वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता पणाला लावत प्रकल्प पूर्ण करावेत. त्यातून जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणावी, अशी अपेक्षा शासनाची असते. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्याची पद्धत सुरू करण्यात आली.
प्रशस्तिपत्रक व गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्राप्त अभियंत्यांचे जलसंपदा विभागातील विविध संघटना, अधिकारी वर्ग व पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींकडून अभिनंदन होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एका विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.