ऑनलाइन वस्तू खरेदी करताय, तर सावधान! जेजुरीत एकाला दोन हजार रुपयांचे घड्याळ पडले ५० हजारांना
जेजुरी : ऑनलाइन घड्याळ मागविणे एकाला चांगलेच महागात पडले असून, दोन हजार रुपयांच्या घड्याळासाठी सायबर चोरट्यांनी ५० हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या सायबर विभागाकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
जेजुरी येथील अतुल सुलाखे यांनी ॲमेझॉन कंपनीतर्फे जानेवारी महिन्यामध्ये फायरबोल्ट कंपनीचे दोन हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ मागविले होते. ते घड्याळ त्यांना मिळाले मात्र दोनच दिवसात ते नादुरुस्त झाल्याने त्यांनी कंपनीकडे रीतसर तक्रार केली. या घड्याळाला वॉरंटी असल्याने कंपनीने त्यांना इ-मेल करून कुरिअर कंपनीद्वारे दुसरे घड्याळ पाठविले असल्याची माहिती दिली. आमचा प्रतिनिधी आल्यावर नादुरुस्त घड्याळ परत द्यावे असे त्यांना सांगितले होते.
दरम्यान, नवीन घड्याळ मिळत नसल्याने त्यांनी कुरिअर कंपनीच्या स्थानिक कार्यालयात जाऊन चौकशी केली असता पुणे परिसरात घड्याळ आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुलाखे यांनी कुरिअर कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता, नितीन शर्मा नावाच्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क झाला. तुमचा पत्ता चुकीचा असल्याने आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो. फॉर्म भरा व ऑनलाइन पाच रुपये पाठवा असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार चार दिवसांपूर्वी सुलाखे यांनी ऑनलाइन पाच रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या खात्यातून पाठविता न आल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून पाच रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एटीएम क्रमांक लिहिण्याचा मजकूर होता. तो त्यांनी लिहिला. मात्र पाच रुपये पाठविता आले नाहीत. शेवटी आमचा माणूस आल्यावर त्याच्याकडे रोख पाच रुपये द्या, असे शर्मा नावाच्या व्यक्तीने सांगितले. मात्र आज सकाळी त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये वजा झाल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?
अनेकदा लुटारू हे फसव्या लिंक पाठवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. अनेकदा मोबाईल धारक सहजरित्या या लिंक ओपन करून पाहतात. अन आपसूक मोबाईल धारकाची बँक डिटेल्स चोरट्याकडे जाते. त्यामुळे बँक असो किंवा इतर कुठलेही शासकीय विभाग कधी लिंक पाठवत नाही. मोबाईलवर येणाऱ्या असंख्य लिंक या फसव्या असतात. याची दखल घेऊन कुठल्याही प्रकारे लिंक डाउनलोड किंवा लिंकद्वारे व्यवहार करू नका, अन्यथा ऑनलाईन भामटे हे तुमच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करीत आहेत. लिंक आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. तेव्हा अशा बनावट लिंकला बळी न पडता सतर्क राहणे हाच यावरील प्रभावशाली उपाय आहे.