पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज व अतिक्रमणे ३० जूनपर्यंत काढण्याचे आवाहन; अन्यथा कारवाई
खेड शिवापूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीमध्ये पुणे सातारा रा. म. क्र. ४८ वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोडच्या दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३० जूनपर्यंत काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तोपर्यंत ही अतिक्रमणे न काढल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन व नागरिकांनी आपल्या होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे असतील तर स्वखर्चातून काढून घ्यावे. अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ॲक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. व त्याचा खर्च व दंड संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल.
विहीत मुदतीनंतर होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोद घ्यावी, असेही पुणे एनएचएआयच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.