मराठा आंदोलन ३ मार्च पर्यंत स्थगित; मनोज जरांगेंची घोषणा

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्चपर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

‘राज्य सरकार सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही, उलट मला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान केलं जात आहे’ असं म्हणत जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्यावर खालच्या भाषेत टिपण्णी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने जरांगेंची एसआयटी चौकशी लावली असून अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरु केली आहे. शिवाय संचारबंदीदेखील लागू केली आहे.

या प्रकारानंतर आज बुधवारी(दि. २८ फेब्रुवारी) मनोज जरांगे पाटील यांनी ३ मार्च २०२४ पर्यंत मराठा आरक्षण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी प्रशासनाकडून अंतरवाली सराटी येथील मंडप काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा जरांगे पाटील आक्रमक झाले. त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडत अंतरवालीकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पुन्हा प्रशासनाने माघार घेत मंडप काढणार नसल्याचं स्पष्ट केले.

Advertisement

आज बुधवारी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांचा द्वेष करताना दिसून येत आहे. अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरु आहे. राज्य सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय. आता जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही. तुरुंगात तडफडून मृत्यू झाला तरी उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं.

जरांगे पुढे म्हणाले, मागील महिन्याभरापासून सरकारने कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप थांबवलेलं आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेत रास्ता रोको करत होतो परंतु आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे आता आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

”सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण ज्यांना हवे त्यांनी घ्यावे. आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे. इंग्रजांनीही कधी केली नसेल अशी दडपशाही सध्या सुरु आहे. मराठ्यांविषयी जातीय द्वेष केला जात आहे. इन्स्टाग्रामवर बंदुक दाखवलेला फोटो टाकणं. यातलाच प्रकार आहे. मला जेलमध्ये टाकलं तरी आमरण उपोषण सुरुच राहणार समाजासाठी तडफडून मरायला तयार आहे.” अशा शब्दांमध्ये जरांगेंनी सरकारचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page