खेड शिवापूर येथील गुटखा कारवाईत तब्बल ८ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त; राजगड पोलिसांची कारवाई
खेड शिवापुर : पिकअप टेम्पो मधून अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेताना राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील खेडशिवापुर (ता. हवेली जि. पुणे) येथील प्रसाद हॉटेल समोर पुणे सातारा महामार्गावरील लेनवर राजगड पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन तब्बल ८ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
पुणे सातारा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी नेला जातो अशी गोपनीय माहिती राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना मिळाली. त्यांनी तात्काळ यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. राजगड पोलिसांनी सापळा रचून रविवारी (१० डिसेंबर) रोजी रात्री खेडशिवापुर येथील प्रसाद हॉटेलच्या समोर सातारा पुणे हायवे लेनवर असणाऱ्या पिकअप टेम्पो ची झडती घेतली असता त्यामधे ३ लाख ९० हजाराचा व्ही-१ तंबाखु व विमल पानमसाला मिळून आला. यावेळी ५ लाख रुपये किंमतीच्या पिकअप टेम्पो (एम.एच.४५.ए.एफ.२०४१) सहीत मोहन मारूती कोकरे (वय २७ वर्षे रा. निजामपुर ता. सांगोला जि.सोलापुर) यास राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करीत आहेत.